Published On : Mon, Jun 14th, 2021

सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवासी, नागरिक व मेट्रो कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान,जागतिक रक्तदान दिवसाच्या निमित्ताने केले आयोजन

नागपूर : ब्रेक द चेन अंतर्गत पुनः एकदा सर्व बाबी पूर्वपदावर येत असताना, आज जागतिक रक्तदान दिवसाच्या निमित्ताने महा मेट्रोच्या सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रेडियो मिर्ची ९८.३ एफएमच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोविड- १९ काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवल्याचे निर्देशनात आले, याच पार्श्वभूमीवर आज सदर शिबीर आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तसेच मेट्रो प्रवाश्यानी आणि सोबत मेट्रो कर्मचारी व अधिकाऱ्यांनी देखील सहभाग नोंदविला. झोन ३ चे उप पोलीस आयुक्त श्री. लोहित मतांणी यांनी देखील या शिबिरात सहभाग नोंदविला. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्त दान करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. श्री. मतांणी यांनी सांगितले कि त्यांनी आजवर २०-२५ वेळा रक्तदान केले आहे. एका चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

शासकीय वैद्यकीय रुग्णालय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले कि कोरोना काळात रक्तदानामुळे नागरिकांचे जीव वाचले आहे. कोरोना काळात रक्ताचा तुडवडा जाणवला त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करायला पाहिजे, जागरूकता वाढविणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शासकीय वैद्यकीय रुग्णालयचे समाजसेवा अधीक्षक श्री.किशोर धर्माले यांनी या शिबिराचे आयोजन प्रसंगी सांगितले कि, नागरिकांनी या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी या संदर्भात जन जागृती करायला पाहिजे ज्याने इतर नागरिकांना निश्चितच लाभ होईल.

मेट्रो प्रवासा सोबत रक्तदान
नियमित मेट्रो प्रवास करणारे श्री. ठाकरे यांनी आज रक्तदान केले. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, आज मी घरून मेट्रोने प्रवास करीत सिताबर्डी इंटरचेंज येथे रक्तदान करायला आलो. अतिशय चांगल्या पद्धतीने मेट्रो प्रवाश्याना कोरोनाच्या बचावा बाबत जागृत करण्यात येत आहे,” असे सांगत त्यांनी या बाबत समाधान व्यक्त केले.’ मेट्रो परिसरात विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच सुरक्षित प्रवास करत असल्याचे देखील श्री. ठाकरे म्हणाले.