Published On : Mon, Jun 14th, 2021

शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राखली जाणार पुतळ्यांची निगा

नागपूर : नागपूर शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या पुतळ्यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन व्हावे याकरिता आता नागपूर महानगरपालिकेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची साथ मिळाली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाशी संलंग्न १५१ महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या समुह संघाद्वारे आता पुतळा दत्तक घेउन त्याची निगा राखली जाणार आहे.

नागपूर शहरामध्ये विविध महापुरूषांचे पुतळे अस्तित्वात आहेत. मात्र या पुतळ्यांचे व्यवस्थापन पुरेशा प्रमाणात होउ शकत नाही. त्यामुळे मनपावर बरीच टिका होत असते. शहरात महापुरूषांच्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी बरेच आंदोजन केले जातात. परंतू पुतळा स्थापित झाल्यानंतर त्याकडे जयंती अथवा पुण्यतिथीलाच लक्ष जात असते. इतर दिवशी हे पुतळे दुर्लक्षित राहू नयेत, त्यांचे जयंती व पुण्यतिथीच्या दिवसाप्रमाणेच व्यवस्थापन व्हावे, यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलंग्न १५१ महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या समुह संघाद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याची दखल घेवून या अभिनव योजनेचा समावेश स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी म.न.पा.ला सादर केलेल्या आपल्या अंदाजपत्रकात केला आहे.

महापौरांच्या संकल्पनेनुसार राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रत्येक विद्यालयातील स्वयंसेवक एक पुतळा दत्तक घेईल. त्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून पुतळ्याच्या परिसरातील व्यवस्थापन करण्यात येईल. समुहसंघाद्वारे पुतळ्यांचे व परिसराचे निरीक्षण केले जाईल व त्यातून आवश्यक सूचना ते मनपाला देतील. पुतळ्यांची साफसफाई मनपाच्या माध्यमातून केली जाईल. पुतळा पाण्याने स्वच्छ करण्याचे कार्य मनपाचे अग्निशमन विभाग करेल. या कार्यामध्ये सहभागी होणा-या प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सेवा देणा-या विद्यार्थ्यांना मनपातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. या माध्यमाने मनपा आणि विद्यापीठच्या सहकार्याने पुतळयांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होईल.