वर्धा – दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि वर्धा सोशल फोरमद्वारे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले स्मृतिदिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सावंगी येथे बचत गटांकरिता आयोजित कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सावंगी येथील सभागृहात आयोजित या समारोहाचे उद्घाटन दत्ता मेघे यांनी केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूलवार, जिल्हा उद्योग केंद्र प्रमुख कमलेश जैन, जिल्हा ग्रामीण योजनेच्या सह प्रकल्प संचालक स्वाती वानखेडे, अभिमत विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. श्वेता काळे पिसूळकर, वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, साहित्यिक संजय इंगळे तिगावकर, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, डॉ. शिल्पा सातव, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, वर्धा सोशल फोरम सचिव अविनाश सातव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे २२० महिला बचत गटातील पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. कार्यशाळेत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निमा आचार्य यांनी स्त्रियांचे कर्करोग आणि उपचार, एमगिरी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्या प्रशिक्षक उमा थेरे यांनी ग्रामीण उद्योजकता, स्वाती वानखेडे यांनी बचत गटाकरिता विविध योजना तर कमलेश जैन यांनी गृह उद्योगांकरिता अर्थसहाय्य व अनुदान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट व वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या ८० बचत गटांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून या समारोहाचे सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभ्युदय मेघे यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार अविनाश सातव यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात सोशल फोरमचे सदस्य श्रीकांत राठी, श्याम परसोडकर, रवींद्र टप्पे, राहुल अवथनकर, राजू वानखेडे, सुधाकर मेहेरे, पुरुषोत्तम खासबागे, गणपत मेटकर, अक्षय मेहेरे, प्रशासकीय प्रमुख सावंगी मेघे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, डॉ. रूपाली नाईक, सुशांत वानखेडे, हरीश पारसे, राकेश अगडे, विनय भरणे, सुलोचना मोहोड, छाया घोंगडे, छाया बोबडे, मोहित सहारे, राधा भांडारकर, लकी विश्वास, श्वेता भांडेकर, नीलम मोटवानी, तोषी दिवाण, प्रतीक्षा इंगोले, संजना उराडे, प्रिया गोडे, योहाना शेख, खुशबू कुंडू, स्नेहा हिवरे, अपर्णा चोरे, मदन बुरकुंडे, विजय चौधरी यांचे विशेष योगदान लाभले. या कार्यक्रमाला सभागृहात महिलांची भरगच्च उपस्थिती होती.