वर्धा – बालपणाच्या आनंदापासून दुरावत चाललेल्या पाच वर्षीय रुग्णाच्या दातांचे अद्यावत उपचार आणि दातांची पुनर्बांधणी करीत त्याच्या ओठांवर पुन्हा वेदनामुक्त हसू फुलविणारी शल्यचिकित्सा सावंगी मेघे येथील शरद पवार दंत रुग्णालयातील दंतचिकित्सकांद्वारे करण्यात आली.
यवतमाळ येथील आबिद अन्सारी (५) याच्या खालच्या जबड्याला उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला वेदना होत असल्यामुळे गत तीन महिन्यांपासून दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता. वेदनेमुळे जेवण, झोप, अभ्यास, खेळणे या सर्वच गोष्टींवर परिणाम झाल्याने या बालरुग्णाची अस्वस्थता वाढली होती. अचानक उद्भवणाऱ्या दुखण्यामुळे नियमित शाळेत जाण्यावरही परिणाम होऊ लागला. विशेषतः अन्नग्रहण करताना, खाद्यपदार्थ चावताना त्याला हा त्रास तीव्रतेने होत होता. पुरेसा आहार पोटात जात नसल्यामुळे त्याचे वजनही वयाच्या तुलनेत अत्यंत कमी झाले होते.
यवतमाळ येथे उपचार न झाल्याने आबिदला सावंगी येथील दंत रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, तीव्र दातदुखीमुळे तपासणीच्या वेळी तो डॉक्टरांना सहकार्य करीत नसल्याने त्याला सुंघनी देऊन उपचार करण्याचा निर्णय बालरोग आणि प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा विभागातील चिकित्सकांनी घेतला. रुग्णतपासणीत आबिदाचे संपूर्ण दात किडलेले दिसून आले. अखेर बधिरीकरण तज्ज्ञांच्या मदतीने दंतशल्यचिकित्सकांनी या बालरुग्णावर यशस्वीरीत्या उपचार केले. यावेळी त्याच्या ७ दातांचे रूट कॅनल करण्यात आले. रुग्णाच्या दोन दातांमध्ये सिमेंट भरण्यात आले, पाच दातांची पुनर्बांधणी करण्यात आली तर सहा दातांवर कॅप लावण्यात आली.
तत्पूर्वी चिरा देऊन बाधित भागातील पस काढण्यात आला आणि दातांना कीड लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारही करण्यात आले. शिवाय, दंतोपचार तज्ज्ञांनी समोरच्या दातांची सौंदर्यात्मक बांधणी करीत त्याच्या ओठांवर निखळ स्मितहास्य फुलविले. या उपचार प्रक्रियेत डॉ. रामकृष्ण येलुरी, डॉ. मोनिका खुबचंदानी यांच्यासह डॉ. आकृती चंद्रा, डॉ. हिमानी पारख, डॉ. ऋतुजा पाटील, डॉ. मुस्कान चौकसे, डॉ. अमोल सिंघम, डॉ. शुभम रहाणे या डेंटिस्ट व बधिरीकरण तज्ज्ञांचा सहभाग होता.
सध्या रुग्ण वेदनामुक्त असून त्याचा आहार आणि दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असल्याचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक यांनी सांगितले.