नागपूर : नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत सावनेर महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दोन भावांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावाचीही प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
सावनेर महामार्गावरील कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत गणेश नगरी येथे असलेल्या बीएसएनएलच्या गोदामासमोर हा अपघात झाला. ट्रकचालक पवित्र विजय तिरपुडे याने आपला ट्रक बेदरकारपणे व भरधाव वेगात चालवत असताना कमुद्दीन खान व त्याचा भाऊ बदुद्दीन खान यांना धडक दिली.
या अपघातात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान कमुद्दीन खानचा मृत्यू झाला तर या अपघातात बदद्दीन खान गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.