नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यात महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले.
शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत का याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही झिरवाळ यांनी भाष्य केले.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेचीही इच्छा आहे. परंतू शेवटी हे महायुतीचे नेते आहेत. त्यात मग पंतप्रधान मोदी, अमित शाह हे बसून जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की, दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी माझी इच्छा आहे, असे नरहरी झिरवाळ म्हणाले.