नागपूर : सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर आणि मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान अतिरिक्त साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छठपूजा या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
गाड्यांचे वेळापत्रक-
- गाडी क्रमांक 02139 (लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर):
ही साप्ताहिक सुपरफास्ट गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री 00:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15:30 वाजता नागपूरला पोहोचेल. ही सेवा 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल. - गाडी क्रमांक 02140 (नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस):
ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी 13:30 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (शनिवारी) पहाटे 04:10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही सेवा 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
डब्यांची संरचना-
या विशेष गाड्यांमध्ये एकूण 20 डबे असतील. त्यात 05 जनरल सेकंड क्लास, 10 स्लीपर, 03 एसी थर्ड क्लास आणि 02 गार्ड-कम-लगेज व्हॅनचा समावेश असेल.
विशेष भाडे-
विशेष गाड्यांचे भाडे नियमित गाड्यांच्या तुलनेत 1.3 टक्के अधिक असणार आहे. प्रवाशांनी तिकीट आरक्षणासाठी अधिकृत IRCTC पोर्टल किंवा रेल्वे बुकिंग काऊंटरचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.