Published On : Mon, Aug 26th, 2019

लाल शाळेच्या परिसरात बनणार अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’

लवकरच होणार भूमिपूजन : दयाशंकर तिवारी यांचा पुढाकार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गीतांजली चौकातील लाल शाळेच्या परिसरामध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ तयार करण्यात येणार आहे. मनपाद्वारे तयार करण्यात येणारी ही ‘ई-लायब्ररी’ ब्रिटीश ‘ई-लायब्ररी’च्या संकल्पनेवर आधारित असून यासाठी पाच कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आले आहे. ‘ई-लायब्ररी’च्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असून यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिली.

अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ची तीन मजली इमारत राहणार असून येथे तळमजल्यावर पार्कींगची व्यवस्था, पहिल्या माळ्यावर १२५ विद्यार्थ्यांसाठी प्रेझेंटेशन, सेमिनार, कार्यशाळा यादृष्टीने वातानुकुलित सभागृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. बाहेरगावावरुन येणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासात सुविधा व्हावी यासाठी त्यांच्या सामानाची व्यवस्थित काळजी घेतली जावी यासाठी याच माळ्यावर एक क्लॉक रुम तयार करण्यात येणार आहे. याशिवाय अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’च्या व्यवस्थापन कार्यालयाचीही व्यवस्था याच माळ्यावर करण्यात येईल.

दुस-या माळ्यावर २५ विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी २५ संगणक संच व २४ तास इंटरनेट सुविधा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात ‘ग्रुप डिस्कशन’साठी चार विद्यार्थी क्षमतेच्या वेगळ्या तीन कॅबिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी वेगळे कक्ष तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, रिफ्रेशमेंटसाठी पँट्री व किंमती वस्तूंच्या संरक्षणाच्या दृष्टीने लॉकर आदी व्यवस्थाही अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’मध्ये प्रस्तावित आहे. दुस-या माळ्यावरील सुविधेप्रमाणे तिस-या माळ्यावरही सर्व सुविधा करण्यात येईल.

‘ई-लायब्ररी’ची संपूर्ण इमारत ‘ग्रीन बिल्डींग’ राहणार असून इमारतीच्या छतावर सौर उर्जा पॅनल लावण्यात येणार आहे. संपूर्ण इमारत वातानुकुलित राहणार असून विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेउन त्यांना अभ्यासासाठी अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येईल.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात शिक्षणाला मुलभूत अधिकारात सामील करून सर्वांना शिक्षित करण्याचा संकल्प केला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत ही अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येत आहे, असे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आपल्या निवेदनावर दखल घेत या ‘ई-लायब्ररी’साठी पाच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून विशेष अनुदान म्हणून देण्याची घोषणा केली होती. हा निधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मनपाला प्राप्त होईल. सद्या मनपाने अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधी ठेवला आहे. प्रकल्पाचे निविदा व कार्यादेश प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या गणेशोत्सवादरम्यान या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा मानसही ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

सुप्रसिद्ध आर्कीटेक्ट प्रशांत सातपुते यांनी अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’चे डिझाईन तयार केले आहे. नागपूर महानगरपालिकेचे मुख्यअभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवींद्र बुंधाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, स्थापत्य सहायक सुनील दुमाने यांच्या निरीक्षणात हे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे.