Published On : Sat, Jul 20th, 2019

मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत राजकीय पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक

कामठी : आगामी होणाऱ्या कामठी-मौदा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगूल वाजला असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यांद्याचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला.

त्यानुसार येत्या महिनाभरात मतदार यादी अपडेट करून अंतिम यादी 19 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे तेव्हा या मतदार नोंदणी व मतदार याद्याबाबत दावे व हरकत प्राप्त करणे संदर्भात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली आज 4 वाजता कामठी तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षाची विशेष बैठक घेण्यात आली.

बैठकीत मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची विस्तृत माहिती देत मतदार यादीतील आक्षेपार्ह नाव वगळण्यासाठी नमुना क्र 7 चे फॉर्म भरणे आवश्यक आहे.यामध्ये मयत, दुबार मतदार,कायमस्वरूपी इतर ठिकाणी स्थलांतर होऊन वास्तव्यास असलेल्या अशा विविध प्रकारच्या आक्षेपार्ह असलेल्या मतदारांचे नाव कमी करण्यासाठी नमुना क्र 7 च्या सादरीकरणावरच पुढील आक्षेपार्ह मतदाराला नोटीस बजावून शहनिशा करूनच नावे कमी करण्यात येणार असल्याची विशेष माहिती दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या.निर्देशानुसार निवडणूक यादीचे पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी ज्या मतदारांचे वय अठरा वर्षे पूर्ण आहे, परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करून निर्दोष अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सोमवारी (दि.15) या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे.यानुसार कामठी-मौदा विधानसभा मतदार संघात एकूण 4 लक्ष 17 हजार 277 मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये 2 लक्ष 14 हजार 875 पुरुष तर 2 लक्ष 2 हजार 396 स्त्री व इतर 6 मतदारांचा समावेश आहे .यातील कामठी तहसील अंतर्गत 2 लक्ष 19 हजार 698 मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये 1 लक्ष 13 हजार 74 पुरुष तर 1 लक्ष 6 हजार 622 स्त्री मतदार व इतर 2मतदारांचा समावेश आहे. त्यावर 30 जुलै पर्यंत दावे, हरकती स्वीकारायच्या आहेत. महिनाभरात चार दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे.

त्यानंतर दाखल दावे, हरकती निकाली काढून जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा यादी निरीक्षकांकडून मतदार यादीची विशेष तपासणी होईल. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हीच यादी विधानसभा निवडनुकीसाठी वापरली जाणार आहे.तसेच आगामी विधानसभा निवडणुकिमध्ये पात्र असलेला मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी नागरिकांनी याची दखल घेऊन 15 ते 30 जुलै 2019 दरम्यान नेमून दिलेल्या नजीकच्या मतदान केंद्र तसेच तहसील कार्यालय कामठी कडे अर्ज करावा तसेच मतदार यादीत नाव असल्याबाबत खात्री करून घ्यावी व छायाचित्र मतदार यादित अद्यावत करण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

असा आहे कार्यक्रम:-प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 15 जुलै 2019 (प्रसिद्ध झाली), दावे, हरकती स्वीकारणे15 ते 30 जुलै, विशेष मोहिमेचे दिनांक-20, 21, 27, 28 जुलै, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून तपासणी 5 ऑगस्टपर्यंत, दावे व हरकती निकाली काढणे-13 ऑगस्टपर्यंत, डाटाबेस अपडेट, पुरवणी यादी छपाई 16 ऑगस्टपर्यंत व अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 19 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे

या बैठकीला कांग्रेस,भाजप, बसपा,रिपाई , भारिप आदी राजकीय पक्षीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यानुसार बैठकीत नायब तहसीलदार आर ऊके, कांग्रेस चे नाना कंभाले,कृष्णा यादव, राजकुमार गेडाम, तर भाजप चे रमेश चिकटे, रवी पारधी, भावना चांभारे, लीलाधर काळे, भगवान कोरडे, निकेश कातुरे, बसपा चे मनोज रंगारी, विकास रंगारी, रिपाई चे सुधीर शंभरकर, सुरेश अढाऊ, तर भारिप चे राजेश ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी