Published On : Sat, Jul 20th, 2019

‘इनोव्हेशन पर्वा’च्या माध्यमातून रचला जाणार शाश्वत विकासाचा पाया

महापौर नंदा जिचकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक

नागपूर : ‘महापौर इनोव्हेशन अवॉर्ड’च्या यशस्वी आयोजनानंतर ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेले ‘इनोव्हेशन पर्व’ म्हणजे शाश्वत विकासाचा पाया आहे. या माध्यमातून येणाऱ्या संकल्पना ज्या-ज्या शासकीय विभागाशी संबंधित आहेत त्या-त्या विभागाकडे वर्ग करण्यात येईल. त्या विभागाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होणे म्हणजे खऱ्या अर्थाने या उपक्रमाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने युवा संशोधकांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मानकापूर स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स येथे ‘इनोव्हेशन पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवकांसोबत विविध शासकीय विभागांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने आणि अधिकाऱ्यांना उपक्रमांची माहिती देण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. २०) मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रुपा रॉय, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, उपमुख्य व्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, उपअभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मार्च महिन्यात पार पडलेल्या महापौर इनोव्हेशन अवॉर्ड या उपक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. जी-कॉमच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. भविष्यात जगातील मुख्य पाच शहरांमध्ये नव्या संकल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या आणि शहर विकासात उपयोगी ठरणाऱ्या अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल. ‘इनोव्हेशन पर्व’ हा याच उपक्रमाचा पुढचा टप्पा असून यामाध्यमातून येणाऱ्या संकल्पना आता शासनाच्या विविध विभागात उपयोगात कशा आणल्या जाऊ शकतील, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. चांगल्या संकल्पनांना ‘बुस्ट’ देण्यासाठी शासन योजनांचा वापर करून वित्तीय सहाय्यही उपलब्ध करून देता येईल का, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने इनोव्हेशन पर्वात सहभागी होण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, छोट्या-छोट्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने ‘इनोव्हेशन पर्व’चे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे. अनेक क्षेत्रात चांगल्या संकल्पना आहे. त्यांचा प्रत्यक्ष कार्यात अंतर्भाव करणे आवश्यक आहे. अशा संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ‘हिरकणी’ नावाची योजना सुरू केली आहे. इनोव्हेशन पर्वच्या माध्यमातून येणाऱ्या चांगल्या कल्पनांना शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून सहाय्य करू, असा विश्वास त्यांनी दिला. माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून काही चांगले प्रकल्प यंत्रणेत आणले तर नागरिकांनाही सोयीचे होईल आणि विभागांचे काम सोपे आणि लोकाभिमुख होईल, असेही ते म्हणाले. या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू यांनी ‘इनोव्हेशन पर्व’ उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. महापौर इनोव्हेशन अवॉर्डच्या माध्यमातून केवळ महापालिकेतील २७ समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संकल्पना आमंत्रित करण्यात आल्या होत्या. आता शासनाच्या विविध विभागातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी संकल्पना आमंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने मेयर इनोव्हेशन कौन्सिलकडे अशा समस्यांची यादी देण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘इनोव्हेशन पर्व’चे मुख्य समन्वयक केतन मोहितकर यांनी ‘इनोव्हेशन पर्व’च्या वेबसाईट संदर्भात माहिती दिली. ही वेबसाईट प्रवेशिका आमंत्रित करण्यासाठी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. त्यापूर्वी विभागांकडून समस्या आल्या तर त्याचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात येईल. त्या समस्यांवर संकल्पना आमंत्रित करण्यात येतील, असे सांगितले. द हॅकॅथॉन, स्टार्ट अप फेस्ट आणि द ॲक्सलरेटर अशा तीन टप्प्यात ‘इनोव्हेशन पर्व’ राहणार असून देशातील अशाप्रकारचे हे पहिले आयोजन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालेल्या द हॅकॉथॉन आणि महापौर इनोव्हेशन अवॉर्डच्या यशस्वी आयोजनाची चित्रफीत उपस्थितांना आयोजनाबद्दलच्या माहितीसाठी दाखविण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेतही अधिकाऱ्यांनी भाग घेतला. बैठकीला महाजनको, महानिर्मिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ, वनविभाग, कृषी विभाग, नागपूर मेट्रो, अन्न व औषधी प्रशासन विभाग, कौशल्य विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.