Published On : Tue, Feb 11th, 2020

शेतक-यांना किसान क्रेडीट कार्ड देण्यासाठी विशेष अभियान – जिल्हाधिकारी

नागपूर : पिककर्ज नसणा-या शेतक-यांना कृषीविषयक सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी बॅकामार्फत किसान क्रेडीट कार्ड देण्यासाठी 8 ते 23 फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा उपनिबंधक अनिल कडु,नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक मैथीली कोवे,अग्रणी बॅक्‍ व्यवस्थापक विजयसिंह बैस यावेळी उपस्थित होते.

पीक कर्ज मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रेच किसान क्रेडीट कार्ड मिळविण्यासाठी लागणार आहेत.या कार्डची वैधता पाच वर्षे राहणार असुन 1 लक्षापर्यत शुन्य व्याजदर असणार आहे.तर 3 लाखापर्यतच्या रक्कमेवर 1 टक्का व्याज आकारण्यात येईल.शेतक-यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध होण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड योजना असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यामध्ये 1 लाख 55 हजार 850 शेतकरी पी. एम. किसान योजने अंतर्गत लाभार्थी असून वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकाकडून या पैकी 1 लाख 4 हजार 318 लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बँकेकडून पीक कर्ज न घेतलेले 51 हजार 532 पी.एम. योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्ह्यामध्ये शिल्लक आहेत. या शेतकऱ्यांना बँकींग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याबाबत केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनांशियल सर्व्हिसेस यांचेकडून आदेश प्राप्त झाले आहेत.

या शेतकऱ्यांना सुटसुटीतरित्या अर्ज करता यावा यासाठी आय.बी.ए. संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमूना सर्व बँकाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे, कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र व इतर कागदपत्र घेवून ज्या बँकेमधून पी.एम. किसान योजनेचा लाभ घेतला आहे, तेथे संपर्क साधावा.

कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथे पीक कर्ज नसणाऱ्या पी. एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकेकडून माफ करण्यात येईल. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झालेल्यापासून 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बँकामार्फत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या पी. एम. किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था अथवा बँकेकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे जाहिर आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गावस्तरावर यासाठी विशेष मोहिम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्याचेही श्री.ठाकरे म्हणाले.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतर्गंत पात्र शेतक-यांच्या यादया 21 फेबुवारीपासुन प्रत्येक गावात लावण्यात येतील. शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक,कर्ज रक्कम,बॅक्‍ खाते क्रमांक व नाव तपासुन घ्यावे. या योजनेत जिल्हयात 49 हजार 830 शेतकरी पात्र असुन 48 हजार 338 शेतक-यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. 474 शेतक-यांचे आधार बॅक्‍ खात्याशी लिंक नसल्याचे निदर्शनास आले असून या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.