नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती अचानक बिघडल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतर-मंतर परिसरातील आंदोलनही पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली.
गेल्या 20 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे वांगचुक यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असून ते अशक्त झाल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असले तरी ते शुद्धीवर असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी कुटुंबीय आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संमतीशिवाय कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करू नये, अशी मागणी केली आहे.
वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर या कारवाईवरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सरकारवर शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचा आरोप केला असून, या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.





