Published On : Tue, Sep 29th, 2020

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात-महेश तपासे

महेश तपासे यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर जोरदार टीका…

मुंबई – कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात त्यातील केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एक आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपप्रणित एनडीएसोबत येवून सरकार बनवावे असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला होता. त्या सल्ल्याला चोख प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.

ज्या वर्गाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने दिली त्याला बगल देऊन नुसती कविता करण्यात व्यस्त असतात आणि फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल मग ते कारण काहीही असो त्याच प्रयत्नात असतात अशा शब्दात महेश तपासे यांनी रामदास आठवले यांचा समाचार घेतला.

एकीकडे मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपलं मंत्रालय काय करीत आहे? असा सवालही महेश तपासे यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना केला आहे.

कोरोना व त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे उध्वस्त झालेल्या मागास समाजातील उद्योजक , अल्पभूधारक शेतकरी या वर्गातील लोकांसाठी आपण फक्त कविताच केली का असा खडा सवालही प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विचारला आहे.