Published On : Fri, Apr 27th, 2018

नगरसेवकाच्या समन्वयाने पाणी प्रश्न सोडवा

Advertisement

Pintu Zalke

नागपूर: प्रभागातील स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयाने पाणी समस्या सोडविण्यात याव्यात, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिले.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या झोन निहाय बैठकीअंतर्गत शुक्रवार (ता.२७) नेहरूनगर झोनमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी समिती उपसभापती श्रद्धा पाठक, झोन सभापती रिता मुळे, मनपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, विधी समिती सभापती ॲड धर्मपाल मेश्राम, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, माजी विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, नगरसेवक हरिश डिकोंडवार, नगरसेविका स्नेहल बिहारे, कल्पना कुंभलकर, वंदना भुरे, लिला हाथीबेड, मनीषा कोठे, समिता चकोले, मंगला गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सभापतींनी झोनमधील प्रभागनिहाय नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवणकरनगर, श्रीकृष्ण नगर, शक्तीमाता नगर येथे पाणी नियमित करण्याबाबत आणि त्याचा वेळा वाढविण्यात यावा, ही मागणी धर्मपाल मेश्राम यांनी केली. भांडे प्लॉट, गुरूदेवनगर, बापू नगर येथे पाणी नियमित येत नाही, यामुळे नगसेविका दिव्या धुरडे यांनी संताप व्यक्त करत , प्रभागात पाणी टाकी असून देखील पाणी का नाही, असा सवाल अधिका-यांना विचारला. ज्या ठिकाणी नळ उशीरा येतो त्या ठिकाणी नळ लवकर सोडावे, अशा सूचना दिव्या धुरडे यांनी केल्या. त्यावर बोलताना सभापती पिंटू झलके यांनी १५ दिवसाच्या आत सर्व पाणी समस्या सोडविण्यात यावा, असे निर्देश अधिका-यांना दिले. समस्या सोडविल्या नाही तर कारवाई करण्याचा ईशारा पिंटू झलके यांनी दिला.

झोनमधील अन्य नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील समस्या सभापतींपुढे मांडल्या. पाण्याच्या समस्या गंभीर आहे. त्यासाठी ओसीडब्लूने नगरसेवकांच्या समन्वयात राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्या. ज्या ठिकाणी नवीन बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सोपविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली.

प्रभागामध्ये ठिकठिकाणी ओसीडब्लूने गड्डे खोदून ठेवले आहे. ते गड्डेदेखील तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले. दुषित पाणी, पाण्याचा टँकर या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाली. टिल्लू पंप लावणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात यावी, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले.

बैठकीला कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, ओसीडब्लूचे राजेश कारला, प्रवीण शरण, यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.