Published On : Mon, Oct 15th, 2018

गठई कामगारांना स्टॉल वाटपात येणाऱ्या अडचणी आठ दिवसात सोडवा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

नागपूर: गठई कामगारांना व्यवसायासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या स्टॉल्सची अनेक प्रकरणे काही त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत. त्यातील अडचणी दूर करून पुढील आठ दिवसांत सर्व प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला दिले.

संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत गठई कामगारांच्या दुकानांच्या जागेचे लीज पट्टे वाटपासंदर्भात आढावा घेण्यासाठी चर्मकार सेवा संघाच्या निवेदनाची दखल घेत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता. १५) महापौर कक्षात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात त्या बोलत होत्या. बैठकीला मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, निगम सचिव हरिश दुबे, चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, प्रा. डॉ. अशोक थोटे उपस्थित होते.


यावेळी चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांनी गठई कामगारांना दुकानांच्या जागेचे लीज पट्टे वाटप होणे थांबले असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यामुळे गरीब कामगारांचे नुकसान होत आहे. यातील ज्या प्रशासकीय अडचणी आहेत त्या दूर करून दुकानवाटपाला वेग द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी प्रलंबित असलेल्या झोननिहाय प्रकरणांची माहिती जाणून घेतली. गठई कामगारांकडे उपजत कौशल्य आहे. त्यामुळे त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून जर ते व्यवसाय करीत असेल तर ही कौतुकास्पद बाब आहे. जी प्रकरणे प्रलंबित आहे त्यातील त्रुट्या तातडीने दूर करून स्थावर विभागाकडे पुढील आठ दिवसांत ती पाठवावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बैठकीला सहायक आयुक्त राजेश कराडे, गणेश राठोड, प्रकाश वऱ्हाडे, स्मिता काळे, सुवर्णा दखने, चर्मकार सेवा संघाचे पंजाबराव सोनेकर, विजय चवरे, श्याम सोनेकर, भाऊराव तांडेकर, अशोक अहिरवार, महादेव बोडखे, रमेश सटवे, मनोज बिंझाडे, श्रावण चवडे उपस्थित होते.