Published On : Fri, Jun 21st, 2019

पुण्यातील प्रसार माध्यमांनी अनुभवला नागपूर मेट्रो रेल प्रकल्प व्यक्त केले समाधान

नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी नागपुरात आलेल्या पुणे येथील प्रसार मध्यामांच्या प्रतिनिधी मंडळाने नागपूर मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. महा मेट्रो कॉर्पोरेशनकडून नागपूर आणि पुणे मेट्रो रेल या दोन्ही प्रकल्पाचे कार्य केल्या जात आहे.

प्रकल्पाअंतर्गत चारही दिशेने सुरु असलेल्या मेट्रो कार्याचा इंथंभूत आढावा घेतल्या नंतर मेट्रोच्या संपूर्ण कार्यप्रणालीची त्यांनी प्रशंसा केली. मुख्य म्हणजे नागपूर येथील रस्ते व शहरात मेट्रो सुरु झाल्यानंतर दिसणारे बदल वाखाणण्याजोगे असल्याचे ते म्हणाले, मेट्रोचे नियोजन योग्य वेळी सुरु झाल्याने नागपुरात फार त्रास न होता ती यशस्वीपणे सुरु होऊ शकली पुण्यात मात्र लोकसंख्या आणि रहदारी भरमसाठ वाढल्याने प्रकल्पाला प्रयत्न जास्त लागताहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. नागपुरात अत्यल्प काळात मेट्रोमुळे झालेले सौदर्यीकरण पाहून आपल्याला आनंद होत असल्याचे मत यावेळी प्रतिनिधी मंडळाने व्यक्त केले.

सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या उपस्थित प्रसार मध्यामांच्या प्रतिनिधीमंडळाच्या अधिकाऱ्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण दिवस प्रतिनिधीमंडळाने नागपूर मेट्रोचा दौरा केला. दरम्यान प्रतिनिधी मंडळाने खापरी मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी इंटरचेन्ज पर्यंत मेट्रोत प्रवास करून या मार्गावरील पाचही मेट्रो स्टेशनची पाहणी केली.


यादरम्यान नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्व स्थळी विशेष उपस्थित राहून इंथंभूत माहित देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. एकंदरीतच प्रकल्पातील कार्याचा वेग आणि प्रगती पाहून या प्रतिनिधी मंडळाने नागपूर मेट्रोचे कौतुक केले. तसेच पुणे येथे सुद्धा लवकरात मेट्रो सुरु व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय प्रतिनिधी मंडळाने हिंगणा मार्गावरील लिटीलवूड, सुभाषनगर मेट्रो स्थानक, सेफ्टी पार्क, वर्धा मार्गावरील डबल डेक्कर उड्डाणपूल, व्हर्टिकल गार्डन आणि इतर कामकाजाच्या ठिकाणांनाही भेट दिली.