नागपूर : पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत नागपूर जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६,५८८ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले असून त्यातून १०५.४५ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जात आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून दरमहा ३०० युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणे आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. घरांच्या छतावर बसवलेल्या सौर प्रकल्पांमुळे घरासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वीज निर्माण होते आणि त्यामुळे वीज बिल शून्यावर येते. उरलेली वीज महावितरणला विकून नागरिक उत्पन्न मिळवू शकतात.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रकल्प क्षमतेनुसार अनुदान दिले जाते – १ किलोवॅटसाठी ३०,००० रुपये, २ किलोवॅटसाठी ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅट प्रकल्पासाठी ७८,००० रुपये इतके. महावितरणकडून ग्राहकांना नेट मीटरही मोफत दिले जातात.
१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला होता. १६ एप्रिल २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण २६,५८८ सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. एकट्या १६ एप्रिल रोजीच २१२ घरांवर सोलर पॅनल्स बसवण्यात आले.
राज्यात एकूण १,७९,७५३ घरांवर सौर प्रकल्प बसवण्यात आले असून यांची एकत्रित उत्पादन क्षमता ६५१.४२ मेगावॅट आहे. नागपूर जिल्हा या योजनेत आघाडीवर असून राज्यातील एकूण सौर प्रकल्पांपैकी १४.७९ टक्के प्रकल्प आणि १६.४२ टक्के वीज निर्मिती नागपूर जिल्ह्यातून होते.