नागपूर : शहरातील एका रहिवासी परिसरात आज सोलर पॅनलमध्ये आग लागल्याची घटना घडली. श्रीमती उमादेवी जैस्वाल यांच्या मालकीच्या प्लॉट क्रमांक 1272, हल्दीराम Day2Day मागे, भूत बंगला जवळ असलेल्या रहिवासी इमारतीच्या छतावरील सोलर पॅनलमध्ये अचानक अंगार लागल्याची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग पूर्णतः विझवली असून सध्या कुलिंगची (थंड करण्याची) प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्नी लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास सुरू आहे.
महत्वाची बाब म्हणजे सोलर पॅनल सारख्या यंत्रणांचे नियमित देखभाल व तपासणी न झाल्यास अशा घटनांची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.