
नागपूर : नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत अजनी परिसरातून एका आरोपीला 11 ग्रॅम मेफेड्रोन अर्थात MDसह अटक केली. आरोपीकडून MD, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 44 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात चंद्रपूर कनेक्शन असल्याची शक्यता तपासत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरच्या रात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शताब्दी चौकातून ओंकारनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक मार्गावर सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. यावेळी अब्दुल शिराज अब्दुल गफार (वय 38) याला ताब्यात घेण्यात आले.
अब्दुल हा मूळचा ओडिशातील कटक जिल्ह्यातील असून, सध्या नागपुरातील काशीनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून सुमारे 33 हजार 480 रुपये किमतीची 11 ग्रॅम MD, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 1 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 44 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात ‘राहुल’ आणि ‘डेवील’ अशी नावे समोर आली असून, दोघेही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजनीतील MDचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यामागे चंद्रपूरशी संबंधित काही साखळी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



