
नागपूर : सोनेगाव परिसरात नोंद झालेल्या हिट अँड रन प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा केवळ अपघात नसून जुन्या वादातून शेख अक्रम उर्फ भुरू शेख रहमान याला जीपने धडक देऊन ठार मारण्याचा कथित कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात फरार असलेला मकोका आरोपी शेख मोहसिन उर्फ बाबा टायगर शेख मूसा याला क्राईम ब्रँचच्या युनिट-२ने शेगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचून अटक केली.
ही घटना ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सोमलवाडा चौकाजवळील हॉटेल मेमोरेजसमोर घडली होती. चारचाकी वाहनाने शेख अक्रम यांना धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, क्राईम ब्रँच युनिट-२ने स्वतंत्र तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना अक्रम आणि आरोपींमध्ये जुना वाद असल्याचे समोर आले. त्यानंतर ही धडक नियोजनबद्ध पद्धतीने दिल्याचा संशय पोलिसांना आला.
या प्रकरणात शहबाज खान उर्फ सलमान बिल्ला, अमीर बशीर शेख, मोहम्मद साहिल अन्सारी, मोहम्मद तौफिक शेख आणि शेख शरीफ शेख सलीम या पाच आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, शेख मोहसिन उर्फ बाबा टायगर हा फरार होता. संघटित गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
मोहसिन हा अकोला येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर युनिट-२च्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. तो रेल्वेने प्रवास करणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करून शेगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचला. आरोपी स्थानकावर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून दोन मोबाईल फोनसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



