
नागपूर : मित्रांसोबत गेट-टुगेदरसाठी गेलेल्या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचा स्विमिंग पूलमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुही तालुक्यात घडली. गणेश विसर्जनानंतर २०१३ बॅचचे नऊ मित्र एकत्र वेळ घालवण्यासाठी कुही येथील बाल गिरी फार्मवर गेले होते. जेवणानंतर सर्वजण स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना सचिन आवारी यांनी पूलमध्ये उडी घेतली. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
कुही तहसीलमधील मौजा सोनेगाव शिवारातील बाल गिरी फार्म येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. मृतकाची ओळख सचिन घनश्याम आवारी (वय ३८), रा. गायत्री नगर, सचिन लेआउट, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आवारी हे २०१३ मध्ये जीआरपीमध्ये भरती झालेल्या आपल्या आठ बॅचमेट्ससोबत दरवर्षी गेट-टुगेदर करत होते. यंदाही गणेश विसर्जनानंतर सर्वांनी भेटीचा कार्यक्रम ठरवला होता. रात्री सुमारे ९ वाजता नऊ मित्र तीन चारचाकी वाहनांनी नागपुरातून निघाले आणि रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास बाल गिरी फार्मवर पोहोचले.
फार्मवर सर्वांनी मिळून जेवण तयार केले. त्यानंतर सर्वजण स्विमिंग पूलमध्ये पोहत होते. रात्री सुमारे १.३० ते १.४५ वाजताच्या दरम्यान सचिन आवारी यांनी पूलमध्ये उडी घेतली. याचवेळी त्यांच्या डोक्याला जोरदार दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास कुही पोलीस करत आहेत.



