Published On : Thu, Jun 3rd, 2021

‘वंदेमातरम’ हेल्थ पोस्टच्या संचलनासाठी सामाजिक संस्थांनी समोर यावे

महापौर दयाशंकर तिवारी यांचे आवाहन : कार्यवाहीचा घेतला आढावा

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने नागपूर शहरात दहा झोनअंतर्गत सुमारे ७५ वंदेमातरम हेल्थ पोस्ट सुरू करण्यात येत आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. जागा, वीज, पाणी ही संपूर्ण व्यवस्था नागपूर महानगरपालिका करेल. देखरेख, डॉक्टर्स आणि औषधांची व्यवस्था संस्थांनी करणे अपेक्षित आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

‘वंदेमातरम’ हेल्थ पोस्टच्या कार्यवाहीसंदर्भात आढावा घेण्यासाठी गुरुवारी (ता. ३) महापौर कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, आरोग्य सभापती महेश महाजन, स्थापत्य समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, वाहतुक अभियंता श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात शहरातील स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य केले. भविष्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी गंभीर परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे कार्य सुरू आहे. यासाठीही आता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मार्मिक आवाहन त्यांनी यावेळी केले. यासाठी मनपा तर्फे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) काढण्यात आले आहे. याची मुदत ३० जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी संस्थांनी उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम (फोन नं. 9823330934) यांच्याशी संपर्क साधावा. वंदेमातरम हेल्थ पोस्ट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी नगरसेवकांच्या सहकार्याने सुमारे ९३ जागांची नावे आली आहेत. त्यातील ७५ जागा अंतिम करायच्या आहेत. त्यातील १० हेल्थ पोस्ट जागा अंतिम करण्यात आल्या आहेत, त्याचे प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनमध्ये काही जागांना अंतिम करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी दौरा करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

५० बेड्‌सचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार ! हिवरीनगर प्रा.केन्द्राचे लोकार्पण लवकरच
केंद्र शासनाच्या योजनेतून नागपुरात ५० बेड्‌सचे ‘आयुष रुग्णालय’ तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी दाभा नाक्याच्या मागे जागा प्रस्तावित आहे. या रुग्णालयाच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप सोमवारपर्यंत देण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. यासोबतच नारा आणि मिनी माता नगर येथे ३० बेड्‌सचे अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर तयार करण्याचे प्रस्तावित असून त्या कार्यवाहीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सहा झोनमध्ये सहा अभ्यासिका बनविण्याचेही प्रस्तावित असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. महापौरांनी सांगितले की पुढच्या आठवडयात हिवरीनगर येथील प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्राचा शुभारंभ करण्यात येईल.