Published On : Thu, Jun 3rd, 2021

विदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी कोव्हिड लसीकरण सुरु

दोन लस दरम्यान कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करू : महापौर

नागपूर: नागपूर महानगरपालिके तर्फे परदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या १८ वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात म.न.पा.चे इंदिरा गांधी रुग्णालयासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गर्ल्स हॉस्टेल, गांधी नगर आणि पांचपावली स्त्री रुग्णालय, पांचपावली येथे करण्यात आली. महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ इंदिरा गांधी रुग्णालय येथे करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ संजय चिलकर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेसाठी मोठा उत्साह दिसला.

त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे आणि सध्या महाराष्ट्रात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांच्याशी याबद्दल चर्चा केली. आयुक्तांनी या विषयाची गंभीरता बघून हे लसीकरण सुरु करण्याचे निर्देश दिले. नागपुरात साधारणतः २०० विद्यार्थांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. इंदिरा गांधी रुग्णालय येथे कु पूर्वा मालवडे, परिणीता यादव, हर्षल जैस्वाल, संकेत डाहुले, दीक्षांत नंदनवार आणि अन्य विद्यार्थांनी पहिली लस घेतली. त्यांना नर्स अंजु बागडे आणि प्रीति शिंदे यांनी लस दिली.


महापौर श्री तिवारी यांनी सांगितले की सध्या च्या नियमानुसार दोन लस च्या दरम्यान कमीत कमी ८४ दिवसाचा कालावधी असायला पाहिजे तरीपण विद्यार्थ्यांना लवकरात – लवकर दुसरी लस मिळायला पाहिजे, यासाठी शासनासोबत पाठपुरावा सुरु आहे. त्यांनी सांगितले की नागपूरमधील बरेच विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतात आणि त्यांच्यासाठी हि सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात जाता येईल. त्यांनी १८-४४ वर्ष गटाचे विध्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याचा आवाहन केले.

यावेळी कु पूर्वा मालवडे यांनी सांगितले कि त्याला तृतीय वर्ष च्या शिक्षणासाठी रशियाला जायचे आहे. आता त्यांनी कोविशीएल्ड लस च्या पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ही सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आभार मानले. श्री अमित बागडे यांनी सांगितले की तो सुद्धा रशियाला उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. त्यासाठी लस आवश्यक होती. मनपा तर्फे लस देण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, अति.सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. चिमूरकर उपस्थित होते.