Published On : Fri, Aug 9th, 2019

सोशल मिडियावरील नकारात्मकतेने ‘मिहान’चा बळी : अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक

Advertisement

गुंतवणूकदारांची ना : ई डेस्कची गरज व्यक्त

नागपूर: सोशल मिडियावर ‘मिहान’ प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासिनता यावरच अधिक चर्चा दिसून येत आहे. त्यामुळे ‘मिहान’बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेऊन असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत असल्याचे चित्र आहे.

या नकारात्मक चर्चेला आळा घालण्यासाठी तसेच सोशल मिडियावर या प्रकल्पाचे सकारात्मक पैलू पुढे आणणाऱ्या ई-डेस्कची गरज सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिहान प्रकल्पात गुंतवणूक आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने विशेष प्रयत्न करीत आहेत. परंतु सोशल मिडियावर नागपूरकर जनताच नकारात्मक मुद्दे चर्चेत आणत आहे. सोशल मिडियाने यापूर्वीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सोशल मीडियावरील एखाद्या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया, पोस्ट्‌स आदींचा अभ्यास करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठी फौज उभी केली आहे. बहुतांश उद्योजक, गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा निर्णय सोशल मिडियावरील प्रकल्पाची विश्वासर्हता तपासूनच होत असतो.

दुर्दैवाने मिहानबाबत सोशल मिडियावर नकारात्मक नोंदीच आढळत आहे. विशेष म्हणजे या नकारात्मक नोंदी नागपूरकरांच्याच आहेत, अशी खंत पारसे यांनी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकल्पाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाल्याने गुंतवणूकदार मिहानबाबत उदासीन झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. नागपुरात उपलब्ध मनुष्यबळ, कच्चा माल, नैसर्गिंक साधने, केंद्रस्थानी असलेले व दळणवळणाचे पूर्ण सोयी याबाबत सोशल मिडियावर चर्चा होताना दिसत नाही.

कोणताही गुंतवणूकदार हा “कमीत कमी जोखीम व जास्तीत जास्त नफा’ या तत्वावर गुंतवणूक करतो. परंतु मिहानबाबत सोशल मीडियावर “जास्तीत जास्त जोखमी व कमीत कमी नफा” अशी प्रतिमा पुढे येत आहे. मिहानबाबत विकासकारणावर राजकारण भारी पडले असून हीच प्रतिमा जगभरातील गुंतवणूकदारांपुढे आली आहे. मिहान प्रकल्प रोजगाराच्या दृष्टीने शहराचा आत्मा आहे. केवळ मॅरेथॉन, रोड शो करून गुंतवणूकदार येणार नाहीत. सोशल मिडियावर मिहानबाबत 100 टक्के सकारात्मक वातावरणनिर्मिती हा एकमेव पर्याय असल्याचे पारसे यांनी नमुद केले.

केंदीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाची मजबूत पायाभरणी केली असून याचे उत्तम उदाहरण मेट्रो आहे. 11 वर्षे बंगलोर मेट्रो प्रकल्प, 9 वर्षे हैदराबाद मेट्रो प्रकल्प रखडला तर साडेचार वर्षांपासून फरफट चाललेला पुणे मेट्रो प्रकल्पाच्या तुलनेत अवघ्या 24 महिन्यात नागपूर मेट्रो सुरू झाली. उभय नेतृत्वाची, त्यांच्या विकासाच्या कार्यक्षमतेवर शंका घेणे हास्यास्पद आहे, असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

काय आहे ई-डेस्क?
मिहानबाबत सोशल मिडियावर सकारात्मक विषय तंत्रशुद्ध पद्धतीने हाताळण्यासाठी ‘इ-डेस्क फॉर मिहान’ची गरज आहे. “इ डेस्क’ मिहानच्या पुनरुज्जीवनासाठी निर्णायक संकल्पना आहे. ‘इ-डेस्क’द्वारे मिहानची मार्केटिंग, तेथील डिजिटल ऑपरेशन्स, गुंतवणूकदारांशी थेट संपर्क व संवाद, सोशल मीडिया व्यवस्थापन, तत्सम निगडित यंत्रणा “एक खिडकी’ योजनेचा प्रसार करणे शक्य होईल, असे पारसे म्हणाले. यातून गुंतवणूक करण्यासाठी जुनेच नव्हे तर नवे भांडवलदारांच्या समूहाला प्रभावित करणे शक्य आहे.

ज्या दिवशी सोशल मीडियावर मिहानबाबत सकारात्मक विकासकारणाचा ठसा उमटेल, त्यानंतरच गुंतवणूकदार सुरक्षित भावनेने गुंतवणूक, उद्योगासाठी नागपूरची निवड करतील. जनतेनी सोशल मीडियावर सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक आहे. मिहान समृद्ध झाल्यास नागपूरचेही अमेरिकेतील मिनोपोलीस होण्यास फारसा अवधी लागणार नाही.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.