Published On : Sat, May 23rd, 2020

सोशल मिडियातून उत्पादकांना आत्मनिर्भर होण्याची संधी : अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

पुरवठादारांना हवे ई-कॉमर्सचे धडे, ऑनलाईन विक्रीतून चीनला तगडे आव्हान, विदेशी वस्तूंची क्रेज संपणे गरजेचे.

चीनच्या अलीबाबा डॉट कॉम या ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे भारतीयांना आकर्षण असून ते मोडित काढण्यासाठी भारतीय उत्पादक, सेवापुरवठादारांनी ई-कॉमर्सचे धडे घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सोशल मिडियावर अवलंबून असलेल्या तरुणाईला हवे ते ‘ऑनलाईन’ देण्याची तयारी ठेऊन भारतीय उत्पादक, सेवापुरवठादारांना आत्मनिर्भर होण्याची संधी आहे.

भारतीय परंपरागत व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांना एका ऑनलाईन व्यासपीठावर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांतून तयारी सुरू करणे गरजेचे आहे. तरुणाईला मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन शॉपिंग’चे वेड आहे. चीनची ‘अलिबाब डॉट कॉम’ ही ऑनलाईन कंपनी अगदी अगरबत्तीपासून सर्वच भारतीय ग्राहकांना ऑनलाईन उपलब्ध करून देत असून खोऱ्याने भारतीय पैसा ओढत आहे.

कोरोनाच्या जगभर प्रसारानंतर चीनची उद्योगाच्या क्षेत्रातील मक्तेदारी मोडित काढण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यात भारतीय सेवापुरवठादार, उत्पादकांनाही मोठी संधी आहे.

केवळ अलिबाबा डॉट कॉमच नव्हे तर ऍमेझॉनसारख्या विदेशी कंपन्यांच्या तावडीत सापडलेला भारतीय ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भारतीय उत्पादकांनी पाऊले उचलण्याची गरज सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. या कंपन्यांनी भारतीय स्वदेशी कंपन्यांचे कंबरडे मोडले.

मात्र, आता याच स्वदेशी कंपन्या, उत्पादक, सेवापुरवठादारांना ई-कॉमर्सच्या क्षेत्रात भरारी घेण्याची संधी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध झाली आहे.

बारा बलुतेदार, हंगामी उत्पादक, कृषी उत्पादक, ग्रामीणमधील सेवापुरवठादार, परंपरेने व्यवसाय करणारे संघटित, असंघटित उत्पादक, लहान मोठे दुकानदार यांना एका ऑनलाईन शॉपिंग अर्थात ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवश्‍यकतेवर पारसे यांनी भर दिला.

नुकताच केंद्र सरकारने उद्योगाकरिता योजनांची घोषणा केली. त्याचा लाभ घेत स्वदेशी उत्पादनांना जगभर पोहोचविण्याची संधी आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वदेशी कंत्राटदारांकडूनच मुंबई-पुणे महामार्ग तयार केला. हे स्वदेशीचे उत्तम उदाहरण असून आता सोशल मिडियाचीही जोड मिळत आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील तरुणाई मोठा ग्राहक असून स्वदेशीला बळ तसेच विदेशी कंपन्यांसह उत्पादनांचेही आकर्षण संपुष्टात आणण्याची दुहेरी संधी भारतीय उत्पादक, सेवापुरवठादारासाठी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

देशातील तरुणाईला एका क्‍लिकवर हवे ते पाहिजे आहे. सोशल मिडियात गुंतलेली ही तरुणाई उत्तम सेवा, उत्पादने मिळाल्यास स्वदेशी ऑनलाईन कंपन्यांना डोक्‍यावर घेईल. सोशल मिडिया भारतीय लघु, मध्यम उद्योगासाठी ब्रम्हास्त्र आहे. त्याचा अचूक वापर केल्यास अलिबाब डॉट कॉम किंवा ऍमेझॉनसारख्या येथे पाय पसरणाऱ्या विदेशी कंपन्यांना गाशा गुंडाळण्यास वेळ लागणार नाही.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक.