Published On : Tue, Oct 29th, 2019

सोशल मिडियावर नकारात्मकतेचा मतदानाला फटका: अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

Advertisement

उमेदवारांकडून फक्त्त प्रतिहल्ल्यासाठी वापर.जनतेचं मत दुर्लक्षित.

नागपूर: निवडणुकीदरम्यान जनतेची मते किंवा विचारांचा ‘ट्रेंड’ लक्षात घेऊन राजकीय पक्ष, उमेदवारांना सुधारण्याची संधी होती. परंतु राजकीय पक्ष, उमेदवारांनी सोशल मिडियाचा वापर केवळ प्रतिस्पर्ध्यावर प्रतिहल्ल्यासाठीच केला. जनतेने सोशल मिडियावर व्यक्त केलेल्या विचार, अपेक्षांना थारा न देता प्रतिस्पर्धी उमेदवारांबाबत नकारात्मक मजकूर पसरविल्याने मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचे पुढे आले आहे.

विधानसभा निवडणुकीत शहरात जवळपास 60 टक्‍क्‍यांवर मतदानाचा हिशेब प्रमुख राजकीय पक्ष व उमेदवारांनी मांडला होता. त्यानुसार सहज जिंकण्याचे गणितही मांडले होते. परंतु शहरात केवळ पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी तर जिल्ह्यात एकूण 56 टक्के मतदान झाले. सोशल मिडियावरील नकारात्मक प्रचार व प्रसारामुळे मतदानाला फटका बसल्याचा निष्कर्ष सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नोंदविला.

Gold Rate
24 May 2025
Gold 24 KT 96,300/-
Gold 22 KT 89,600/-
Silver/Kg 98,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दिवसेंदिवस मतदानाच्या कमी होणाऱ्या टक्केवारीसाठी नागरिकांच्या उदासिनतेसोबतच राजकीय पक्ष, उमेदवारही जबाबदार आहेत. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी सोशल मिडिया केवळ शक्तीप्रदर्शनासाठीच वापरले. प्रत्यक्षात नागरिकांनी निवडणुकीबाबत, त्यांच्या अपेक्षांबाबत सोशल मिडियावर मत व्यक्त केले, त्याची समिक्षा करून राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी जनतेच्या हितासाठी पाऊले उचलणे अपेक्षित होते. त्याचे सकारात्मक परिणाम मतपेटीवर होणे शक्‍य होते.

परंतु असे घडत नसल्यानेच नोटा किंवा मतदान न करण्याचा पर्याय पुढे आल्याचे पारसे म्हणाले. याशिवाय एखाद्या पक्षाच्या विचारधारेशी अनुकूल नागरिक केवळ उमेदवार आवडीचा नसल्यानेही मतदानास जात नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी सोशल मिडियाचा वापर करून नागरिकांशी संवाद साधत उमेदवार निवडीबाबत मत मागविल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जनता उमेदवाराची प्रतिमा कशी असावी, याबाबत सोशल मिडियावर व्यक्त होत असते. त्यांनी टाकलेल्या पोस्ट अनेकदा उमेदवार कसा असावा, याचे संकेत देत असते. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कमी मतदान होत असून राजकीय पक्षांनी सोशल मिडियावरील मतांची समीक्षा करण्याची सवय न लावणे गरजेचे आहे.

सोशल मिडियाबाबत साक्षर न झाल्यास भविष्यात मतदान सक्तीचा कायदा झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही, असे पारसे यांनी नमुद केले. उमेदवार लादला जात असल्याचे परिणामही या निवडणुकीच्या निकालातूनही दिसून आले. सोशल मिडिया लोकशाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते चुकीचे असून सोशल मिडिया लोकसाहीचा पाचवा स्तंभ ठरत आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे राजकीय पक्षांना महागात पडण्याचा इशाराही पारसे यांनी दिला.

नव्या समिकरणाचा उदय
निवडणुकीत राजकीय पक्ष व जनता असे समिकरण होते. मात्र, आता राजकीय पक्ष, सोशल मिडिया व जनता या नव्या समिकरणाचा उदय झाला. निवडणुकीत सोशल मिडियाचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास राजकीय पक्षांसोबतच चुकीचे उमेदवार निवडून आल्यास जनतेलाही मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

जनतेचा कुठलाही विचार न करता राजकीय एजेंडा राबविण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवारांनी सोशल मिडियाचा टोकाचा नकारात्मक वापर केला. निवडणुकीतील निकालाने हा प्रकार त्यांच्या अंगलट आल्याचे दिसत आहे. पुढे 2021 मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीतही उमेदवारांकडून एकतर्फी प्रसिद्धीचा मारा सुरू राहील्यास मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्‍यता कमीच आहे.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक

Advertisement
Advertisement
Advertisement