Published On : Wed, Apr 4th, 2018

उत्तर नागपूरसाठी एसएनडीएलने ‘ॲक्शन प्लान’ तयार करावा : विरेंद्र कुकरेजा


नागपूर: उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे. विद्युतविषयक अनेक तक्रारीही नगरसेवकांकडे येतात. सुमारे ३५ हजार नव्या विद्युत जोडणीसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत. या सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. एक स्वतंत्र नियोजन उत्तर नागपूरसंदर्भात तयार करून ‘ॲक्शन प्लान’ तयार करावा, असे निर्देश एसएनडीएल आणि मनपाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देत त्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असा विश्वास मनपा स्थायी समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी दिला.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील विद्युतविषयक समस्यांवर एसएनडीएल आणि मनपा विद्युत विभागासोबत विशेष बैठकीचे आयोजन बुधवारी (ता. ४) करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, मनपाचे कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, एसएनडीएलचे मुख्य तांत्रिक अधिकारी राजेश तूलकर, प्रकल्प प्रमुख दीपक लबडे, ऑपरेशन हेड प्रकाश चंदन, मनपाचे सहायक अभियंता (विद्युत) एस. एस. मानकर, उपअभियंता एम.एम.बेग, विद्युत अभियंता कल्पना मेश्राम, कनिष्ठ अभियंता पी. एन. खोब्रागडे, एन.बी. सालोडकर, आर.सी. भाजीपाले, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

यावेळी निर्देश देताना सभापती विरेंद्र कुकरेजा म्हणाले, उत्तर नागपुरात अनेक भागात विद्युत खांब लागलेले नाहीत. अनेक नगरसेवकांच्या माध्यमातून एसएनडीएलकडे त्यासंदर्भात मागणी आलेली आहे. आता ४०० खांबांना मंजुरी मिळाली आहे. पूर्वीचे काही खांब अद्यापही लागलेले नाहीत. हे सर्व खांब तातडीने मागणीनुसार लावण्यात यावे. कमी दाबाचे ट्रान्सफॉर्मर जोडण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे. मोठ्या रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, विद्युत वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटण्यात याव्या, आणि नवीन कनेक्शनसाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश दिले.


निधी कमी पडू देणार नाही : आ. डॉ. मिलिंद माने
उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्युत विषयक अनेक कामे करायची आहेत. यासाठी कामांची यादी आणि प्राथमिकता एसएनडीएलने ठरवावी. या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मनपा स्थायी समितीच्या माध्यमातून, अनुसूचित जाती विशेष निधीतून, आमदार निधीतून निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. ४०० विद्युत खांब मंजूर झाले आहेत, त्यासाठी नगरसेवकांनी मागणी नोंदवावी. त्या मागणीनुसार एसएनडीएलने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार डॉ. मिलिंद माने यांनी दिले.


नगरसेवकांनी मांडल्या समस्या
सदर बैठकीला उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. या सर्व नगरसेवकांनी विद्युतविषयक समस्या मांडल्या. नगरसेविका संगीता गिऱ्हे म्हणाल्या, झिंगाबाई टाकळी-गोधनी भागासाठी १६० विद्युत खांब मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. जे खांब आहेत, त्यावर नंबर टाकलेले नाहीत. नगरसेवक मनोज सांगोळे यांनीही एसएनडीएलचे अधिकारी तक्रारींची दखल घेत नसल्याचे सांगितले. अन्य नगरसेवकांनीही हाय टेंशन लाईन, एलईडी लाईट, नवीन विद्युत जोडणी आदी समस्या मांडल्या.

या नगरसेवकांची होती उपस्थिती
बैठकीला उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवक-नगरसेविकांची उपस्थिती होती. यामध्ये सर्वश्री मोहम्मद इब्राहीम, दिनेश यादव, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, गार्गी चोपरा, अभिरूची राजगिरे, साक्षी राऊत, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, वैशाली नारनवरे, भावना लोणारे, मनोज सांगोळे, संगीता गिऱ्हे, जितेंद्र घोडेस्वार, अर्चना पाठक, नरेंद्र वालदे, रश्मी धुर्वे, स्नेहा निकोसे, अर्चना पाठक, नसीम बानो इब्राहीम खान यांचा समावेश होता.