गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरात असलेल्या एका घरातील दाराच्या चौकटीचे काम करण्यासाठी खोदकाम सुरु असताना एक-दोन नाही तर तब्बल सापांच्या ३९ पिल्ल्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. एक-एक करून हे सर्व साप बाहेर येत असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत 4 तास चाललेल्या या कार्यात घराच्या दाराच्या चौकटीतून मोठ्या प्रमाणात साप बाहेर येत असल्याचे पाहून कुटुंबीयांचा थरकाप उडाला. या घटनेसंदर्भात घराचे मालक राजेश सीताराम शर्मा यांनी नागपूर टुडेशी बोलताना सांगितले की, घर जवळपास 20 वर्षे जुने आहे, मुख्य दरवाजाची लाकडी चौकट दीमक लागल्यामुळे कुजली होती.
शुक्रवार, 7 एप्रिल रोजी घराची साफसफाई करत असताना कामवालीबाईंना सापाचे लहान बाळ दिसले, ज्याला घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्याच दरम्यान दरवाजाच्या चौकटीच्या तडामध्ये तीन ते चार मुंडके दिसली, त्यामुळे त्याठिकाणी अजून काही साप असल्याची शंका आम्हाला आली. त्यामुळे सर्पमित्र बंटी शर्मा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले, त्यांचे सहकारी आकाश शर्मा सोबत त्यांनी दरवाजाची चौकट आणि अंगणातील फरशा काढण्याचे काम सुरु केले. तब्बल चार तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 39 सापांची पिल्ले सुरक्षितपणे पकडले गेले. त्यांना प्लास्टिकच्या बॉक्समध्ये पकडून जंगलात सोडण्यात आले.
नागपुर टुडेशी बोलताना सर्पमित्र बंटी शर्मा म्हणाले की, पकडलेली सर्व 39 सापांची पिल्ले आल्यु किलबाक (तास्या) प्रजातीची आहेत, हे साप विषारी नाहीत.
साधारणपणे अंड्यातून बाळ बाहेर आल्यावर साप त्या ठिकाणाहून निघून जातो.
खरे तर शास्त्री वॉर्डातील या घराच्या अंगणात एक जुनी नाली होती, ती वापरात नव्हती, ती जमिनीत घुसली होती, दाराच्या चौकटीत दीमक लागल्याने सापांना त्याठिकाणी कडे सापडत होते. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या चौकटीला छावणी बनविली. दरवाजाच्या चौकटीत साप दिसल्यावर हळूहळू चिमट्याने सुखरूप बाहेर काढले असता आतून अनेक साप बाहेर येऊ लागले. बचावकार्य 4 तास चालले, पकडण्यात आलेली 39 सापांची बाळे हाताच्या तळव्यापेक्षा थोडी मोठी आहेत, त्यांची लांबी 5 ते 7 इंच असेल आणि हे नवजात साप 1 आठवड्यापूर्वी जन्मलेले असावेत, असा अंदाज सर्पमित्र बंटी शर्मा यांनी व्यक्त केला.
दरम्यान या सर्व सापांच्या पिल्ल्यांना एका बॉक्समध्ये टाकून पांगडी येथील नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलातील नाल्याजवळ सोडण्यात आले.