नागपूर : मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस आणणाऱ्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारागृहातील कैद्यांना एमडी (मेफेड्रोन) व गांजा पुरवणाऱ्या कुख्यात ड्रग पेडलरला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ₹3.50 लाखांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याचा साथीदार फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज ऊर्फ नव्वा प्रमोद गजभिये (वय 35), रा. राजेंद्रनगर, केडीके कॉलेजजवळ, नंदनवन असे आहे. त्याचा साथीदार रोशन रहाणकर सध्या फरार आहे. ही कारवाई नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने गुप्त माहितीच्या आधारे केली.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नव्वा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अमली पदार्थ तस्करीसह किमान सात गुन्हे दाखल आहेत. कारागृहात असलेल्या गुन्हेगारांचे मजबूत नेटवर्क त्याने उभे केले होते. न्यायालयीन सुनावणी किंवा वैद्यकीय उपचारासाठी कैद्यांना कारागृहाबाहेर आणले जाते, त्याच संधीचा फायदा घेत तो एमडी व गांजा संबंधित कैद्यांपर्यंत पोहोचवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे अमली पदार्थ पुन्हा कारागृहात पोहोचवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी रात्री नव्वा अमली पदार्थांची वाहतूक करत असताना एनडीपीएस सेलने त्याला अडवून झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून ₹3.35 लाख किमतीचे एमडी व ₹21 हजार किमतीचा गांजा असा एकूण ₹3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणामुळे मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, फरार साथीदाराचा शोध व कारागृहातील संभाव्य साखळी उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









