नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून अधिकृतपणे संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे सायनाने स्पष्ट केले. तिच्या या निर्णयामुळे संपूर्ण भारतीय क्रीडाजगत भावूक झाले आहे.
पॉडकास्टमध्ये संन्यासाचा खुलासा-
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सायना नेहवाल हिने आपल्या कारकिर्दीच्या अखेरीसंबंधी मनमोकळेपणाने संवाद साधला. गुडघ्यातील कार्टिलेज झिजणे आणि आर्थरायटिसची समस्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने आता ‘एलिट लेव्हल’वरील कठोर सराव करणे शक्य नसल्याचे तिने सांगितले.
सायनाने स्पष्ट केले की, तिने जवळपास दोन वर्षांपूर्वीच स्पर्धात्मक खेळापासून अंतर ठेवले होते. मात्र, आता आपल्या कारकिर्दीचा शेवट सार्वजनिकपणे जाहीर करण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना तिला झाली.
स्वतःच्या अटींवर आले, स्वतःच्या अटींवरच गेले- सभावनिक शब्दांत सायना म्हणाली,मी खेळात स्वतःच्या अटींवर प्रवेश केला आणि आता स्वतःच्या अटींवरच बाहेर पडत आहे. जेव्हा तुम्ही सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करू शकत नाही, तेव्हा स्वतःला थांबवणेच योग्य ठरते.
२०१६ रिओ ऑलिम्पिकनंतर वाढल्या अडचणी-
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान झालेल्या गंभीर गुडघ्याच्या दुखापतीनंतर सायनाच्या अडचणी वाढत गेल्या. त्यानंतर तिने अनेकदा पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र दुखापत वारंवार डोके वर काढत राहिली.
तरीही सायनाने हार मानली नाही. दुखापतीशी झुंज देत तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी पदके जिंकली. हा तिच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि देशासाठीच्या समर्पणाचा जिवंत पुरावा ठरला आहे.
सायना नेहवालचा हा संन्यास भारतीय बॅडमिंटनमधील एका सुवर्णकाळाचा शेवट मानला जात असून, तिचे योगदान कायम स्मरणात राहील.









