नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी नंदीग्राम एक्सप्रेसच्या एका डब्यातून धूर निघू लागल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र, स्टेशनवरील कर्मचारी वेळेवर सतर्क झाल्यामुळे ही दुर्घटना टळली.
ही घटना सकाळी ९:२३ वाजता घडली. नंदीग्राम एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11001) स्थानकावर येत असताना स्टेशन मास्टर अमित शिंदे आणि प्वाइंटमन हेमराज यांच्या लक्षात आले की A1 कोच (CR 104644) च्या खालून धूर येत आहे. त्यांनी तातडीने तपासणी केली असता डब्याच्या स्प्रिंगवर बसवलेल्या रबर कंपोनंटला आग लागल्याचे निदर्शनास आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ लोको पायलट, गार्ड आणि स्टेशन कंट्रोल रूम यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, हेमराज यांनी फायर एक्स्टिंग्विशर घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोन फायर एक्स्टिंग्विशरने आग पूर्णपणे विझली नाही, मात्र कर्मचारी खचले नाहीत. एकूण ८ ते ९ फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून आग पूर्णतः आटोक्यात आणण्यात आली.
सुरक्षा दृष्टीकोनातून S1 कोचला वेगळे (आइसोलेट) करण्यात आले आणि संपूर्ण गाडीची सखोल तपासणी करण्यात आली. गार्डने ट्रेन सुरक्षित असल्याचे घोषित केल्यानंतर सकाळी १०:०५ वाजता गाडी पुढे रवाना करण्यात आली. या प्रक्रियेमुळे गाडीला सुमारे ४२ मिनिटांचा विलंब झाला, मात्र संभाव्य मोठा अपघात टळला.
रेल्वे प्रशासनाने ऑन ड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यांचे सतर्कतेसाठी आणि तत्परतेसाठी कौतुक केले आहे. वेळेवर घेतलेले निर्णय, योग्य प्रशिक्षण आणि सेवा भावना यामुळे एक मोठी दुर्घटना टळली, असे अधिकारी सांगत आहेत. अमित शिंदे आणि हेमराज यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.