Published On : Mon, Dec 2nd, 2019

31 डिसेंबर पर्यंत सर्व बसेस धुरविरहित करा – महापौर संदीप जोशी

परिवहन समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देश

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत सेवेत असणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणावर धुर फेकत असल्याची तक्रार येत आहे. यामुळे प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना त्रास होत असल्याने ते वारंवार तक्रार करत आहे. 31 डिसेंबर पर्यंत या सर्व बसेस धुरविरहित झाल्याचे दृश्यस्वरूपात मला दिसले पाहिजे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

या बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, उपायुक्त राजेश मोहिते, परिवहन श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, वाहतूक व्यवस्थापक बी.आर.सोनटक्के, प्रशासकीय यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, हंसा सिटी बसेसचे आदित छाजेड, ट्राव्हल्स टाईम्सचे सुमीत वैद्य, आर.के.सिटीबसचे प्रतिक राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपाद्वारे चालविण्यात येणाऱ्या आपली बस सेवेच्या बसेसबद्दल वारंवार तक्रारी येत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. बसेस खूप मोठ्या प्रमाणावर धुर फेकत असल्याचे दिसून येत आहे, याला जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. काहिही करा, मला रिझल्ट हवा, असे म्हणत 31 डिसेंबर पूर्वी मनपाच्या शहरात धावणाऱ्या सर्व बसेस धुरविरहित झाल्या पाहिजे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

शहरात किती बस स्थानके आहे, याचा आढावा महापौर संदीप जोशी यांनी घेतला. स्थानके उपलब्ध असून देखील बसेस स्थानकावर न थांबता रस्त्याच्या मधोमध किंवा स्थानकापासून दूर का थांबतात. चालक प्रशिक्षित नाही का ? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. बसस्थानकावर 10 मीटर पुढे मागे रंगरंगोटी करा. पार्किंग असेल तर ते तात्काळ बंद करा. त्याठिकाणी सूचना फलक लावावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर जबाबदारीने लक्ष द्यावे, 31 डिसेंबर नंतर ही स्थिती अशीच दिसली तर अधिकाऱ्यावर व यंत्रणेवर कारवाई करण्यासाठी कसलाही विचार करणार नाही, असा ईशाराही महापौरांनी यावेळी बैठकीत दिला.