Published On : Mon, Feb 4th, 2019

स्मार्ट सिटी प्रकल्प सामान्यांचे जीवनमान उंचावणारा : मुख्यमंत्री

नागपूर सेफ ॲण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे लोकार्पण

नागपूर: सामान्य माणसाला अत्त्यच्च सेवा देणारा आणि ज्या भागात अद्यापही मुलभूत सोयींची वानवा आहे, अशा परिसरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी आणि सुविधा पुरवून सामान्य माणसांचे जीवनमान उंचावणारा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प होय, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील जनतेला विश्वास दिला.

नागपूर सेफ ॲण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे लोकार्पण, प्रोजेक्ट टेंडरशुअर, होम स्वीट होम प्रकल्पाचा शुभारंभ आणि अमृत अभियानांतर्गत अधिकृत/अनधिकृत स्लम वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात आले. यानिमित्ताने भरतवाडा-पारडी वाय प्वाईंड येथे शनिवारी (ता. २) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक संदीप जोशी, मनपा स्थायी समिती सभापती तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक तानाजी वनवे, बसपा पक्षनेते तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक मोहम्मद जमाल, नगरसेविका तथा एनएसएससीडीसीएलच्या संचालिका मंगला गवरे, अतिरिक्त मुख्य सचिव तथा एनएसएससीडीसीएलचे सभापती प्रवीण परदेशी, पोलिस आयुक्त तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक डॉ. भूषणकुमा उपाध्याय, जिल्हाधिकारी तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक अश्विन मुदगल, नासुप्रच्या सभापती तथा एनएसएससीडीसीएलच्या संचालिका शीतल उगले, अवर सचिव एमआरटीएस नागपूर व एनएसएससीडीसीएलचे संचालक दीनदयाल, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीवास, महापालिका आयुक्त तथा एनएसएससीडीसीएलचे संचालक अभिजीत बांगर, एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसांसाठी सर्व सोयीसुविधा असेल आणि त्या सर्वांना परवडणाऱ्या असतील. या प्रकल्पामुळे मालमत्तांच्या किंमतीत पाच पट वाढ होणार आहे. प्रकल्पात ज्याचे घर बाधित होणार आहे, त्याला घर दिल्याशिवाय त्याचे घर पडणार नाही. जो जागा देईल, त्याला त्या मोबदल्यात जागेचे फायदे मिळतील. शंभर टक्के स्मार्ट एलिमेंट असलेला नागपूर हा देशातील पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. राज्य सरकार एक नवा प्रयोग करीत आहे. ‘अर्बन महानेट प्रकल्पा’च्या माध्यमातून अगदी स्वस्तात ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, सर्व सार्वजनिक कार्यालयांना ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. या माध्यमातून हवा तेवढा डेटा वापरता येणार आहे. त्याच्या मोबदल्यात राज्य सरकार वर्षाकाठी केवळ एक रुपया संबंधित संस्थेकडून,कार्यालयाकडून घेणार आहे. यामुळे आता सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल. नागरिकांना वेळोवेळी शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. भ्रष्टाचाराला थारा राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

नागपुरातील प्रकल्प बदलविणार शहराचा चेहरा : नितीन गडकरी
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, एकट्या नागपूर लोकसभा मतदारसंघात ६६ हजार कोटींची विकास कामे निरनिराळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे स्लमबहुल भाग असलेले पारडी आता आदर्श शहरात रुपांतरित होणार आहे. या प्रकल्पामुळे १८ महिन्यात पारडी-भरतवाडा-पुनापूर परिसरातील एक लाख ३३ हजार नागरिकांच्या जीवनात बदल घडणार आहे. २७४ कोटींच्या अमृत योजनेअंतर्गत २४ टँक, ३४० किमीची जलवाहिनी आणि ६० किमीची मुख्य जलवाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होईल. मनपाच्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पामुळे वीज केंद्रांसाठी आरक्षित असलेले पाणीही नागपुरातील नागरिकांच्या पिण्याकरिता वळविण्यात येणार आहे. तीन हजार कोटींच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे नागपूरचा चेहरामोहरा बदलणार आहे, अशी ग्वाही ना. नितीन गडकरी यांनी दिली. अजनी रेल्वे स्टेशन परिसरात पॅसेंजर हब होतोय. लवकरच नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होतेय. ५० हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचा संकल्प केला. २३ हजार रोजगार उपलब्ध करून दिले. पुढील काही वर्षांत नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगाराचे उद्दिष्टही पूर्ण करू. मेट्रोच्या माध्यमातून बनणारा डबल डेकर पूल हा देशातील एकमेव ठरणार आहे. आम्ही जी आश्वासने दिली, ती पूर्ण केली. आम्ही करुन दाखविले. नागपूर शहर बदलत आहे, असेही ते म्हणाले.

पूर्व नागपुरात सहा हजार कोटींची विकासकामे : कृष्णा खोपडे
विकासाचे आदर्श ठरणाऱ्या नागपूर शहरातील पूर्व विधानसभा मतदार संघात मागील चार वर्षांत झालेली आणि सुरू असलेली विकास कामे सहा हजार कोटींची आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प नागपूरसाठीच नव्हे तर देशातील अन्य शहरांसाठी अभ्यासाचा विषय ठरणार आहे. काही लोकांची राजकीय दुकानदारी बंद होणार असल्यामुळे ते नागरिकांना समोर करुन विरोध दर्शवित आहे. या विरोध करणाऱ्यांची मानसिकता आपण ओळखायला हवी, असे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले. पारडी-भरतवाडा वाय प्वाईंटला स्व. नारायणराव अरसपुरे असे नामकरण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या क्षेत्राधिष्ठीत विकासांतर्गत होणाऱ्या पारडी-भरतवाडा-पुनापूर येथील १७३० एकर जागेतील विकासकामांची माहिती दिली. एनएसएससीडीसीएलचे सभापती प्रवीण परदेशी यांनीही यावेळी प्रकल्पावर विस्तृत प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले. आभार एनएसएससीडीसीएलचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते.

आयडिया चॅलेंज कॉन्टेस्टचे बक्षीस वितरण
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवनवीन संकल्पना मागविण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘आयडिया चॅलेंज कॉन्टेस्ट’मधील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. गौरव चौकसे, मंदार तुलनकर, अनुराग कुमार, ऋषभ चौरसिया, प्रफुल्ल घारपुरे, मनीष गोडे, अमेय देशमुख, सुभाष भावे यांना सन्मानित करण्यात आले.