Published On : Mon, Feb 4th, 2019

शहराच्या परिवर्तनाची खरी शिल्पकार जनताच : मुख्यमंत्री

Advertisement

मेट्रो मॉल भूमिपूजनसह दक्षिण-पश्चिम मतदार संघातील विविध विकासकामांचा शुभारंभ

नागपूर: आज नागपूर शहर बदलत आहे. जागतिक दर्जाचे सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे नागपुरात सुरू आहेत. मेट्रोसह अनेक पथदर्शी प्रकल्प आज देशाचेच नव्हे तर जगाचेही लक्ष आपल्या शहराकडे वेधून घेत आहेत. मागील पाच वर्षात शहरात सुरू असलेल्या या विकासाच्या झंझावतामुळे शहरात सर्वत्र परिवर्तन घडून येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या परिवर्तनाला स्थानिक जनप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे सहकार्य आहेच, मात्र या परिवर्तनाची खरी शिल्पकार नागपुरातील जनताच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Advertisement
Advertisement

केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाचा टप्पा-१ अंतर्गत मेट्रो मॉलच्या बांधकामासह नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील विविध १३ विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता.२) डिजीटल भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार प्रा. अनिल सोले, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयुक्त अभिजीत बांगर, ऑरेंज सिटी स्ट्रीटचे डिझाईन तयार करणारे आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर, टाटा ट्रस्टचे आशीष देशपांडे, टिव्‍हीएस चेन्नईचे प्रसाद क्रिष्ण्‌न यांच्यासह लक्ष्मी नगर झोनमधील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी वर्धा मार्गावरील जयप्रकाश नगर स्टेशनलगत ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, वर्धा मार्गावरील हॉटेल रेडीसन्स ब्ल्यू ते जयताळा रोड ते यशोदा पब्लिक स्कूलपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विविध भागात रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्ता, नाल्यावरील पूल, मलवाहिका, पावसाळी नालीचे काम, सिमेंट काँक्रीट फ्लोरिंग, समाज भवन, खुले मैदान सुरक्षा भिंत, प्रसाधनगृह, केंद्र शासनाच्या अमृत योगनेंतर्गत दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी ११ पाण्याच्या टाक्या, २१ किमी जलवाहिन्या, ४० किमी वितरण जलवाहिन्या, ज्येष्ठ नागरिकांकरीता ७४ ठिकाणी ग्रीन जिम, खामला येथे जलतरणसह आंतरिक स्पोर्ट्स क्रीडा संकुल, आय.पी.डी.एस. योजनेंतर्गत विविध ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांचे काम, विविध ठिकाणी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मनपाच्या दहा झोनमधील ११ उद्यानांमध्ये ओला व सुका कचरा ग्रेडर मशीनद्वारे बारिक करून ऑरगॅनिक वेस्ट कर्न्व्हटरद्वारे कम्पोस्ट तयार करणे, टीव्‍हीएस मोटर्स चेन्नईकडून प्राप्त सीएसआर योजनेद्वारे ३३ विविध उद्यानांमध्ये ग्रीन जिम साहित्य लावणे, महापौर निधीतून तयार ज्येष्ठ नागरिकांकरीता विरंगुळा केंद्राचे लोकार्पण, ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा विकास कार्यक्रमांतर्गत रेणुका माता मंदिर यशोदा नगर परिसरात विविध विकास कामे आदी कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून डिजीटल भूमिपूजन करण्यात आले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज संपूर्ण शहरात होत असलेली विकासकामे आपल्या शहराचे भवितव्य बदलविणारे आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील गरीब, मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत सुलभता आणणे, त्यांना रोजगार मिळवून देणे हाच या प्रकल्पांचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘व्‍हिजन’मुळे नागपूर आंतरराष्ट्रीय शहर बनत आहे. देशातील सर्वोत्तम शैक्षणिक, वैद्यकीय संस्थांसह मिहानमधील वाढती गुंतवणूक अनेक संधींचे द्वार उघडणार आहे. २०१४ पर्यंत थंडबस्त्यात असणाऱ्या प्रकल्पांना चालना मिळाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. पुढेही शहरात असे मोठे परिवर्तन घडणार आहेत. मात्र हे परिवर्तन जनतेने विश्वास ठेवून दिलेल्या संधीमुळेच होऊ शकले. त्यामुळे शहरात होणाऱ्या प्रत्येक परिवर्तनाची शिल्पकार जनताच सदैव राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ऑरेंज सिटी स्ट्रीटमुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल : नितीन गडकरी
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ऑरेंज सिटी स्ट्रीट हे अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न होते. या भूमिपूजनाच्या निमित्ताने शहरात ऑरेंज सिटी स्ट्रीट साकारण्याची स्वप्नपूर्ती झाली. ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील मेट्रो मॉल हे गरीब, मध्यमवर्गीय यांच्या सोयीच्या दृष्टीने तयार करण्यात येत असून यामध्ये वैद्यकीय सुविधा, बाजार, मासोळी, मटन मार्केट, उद्यान, समारंभासाठी माफक दरात मिळणारे सभागृह, एकाच वेळी एक हजार तरुणांसाठी जिम अशा अनेक आंतरराष्ट्रीय सुविधाही मिळणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवशैलीत बदलासह तरुणांना नवीन रोजगार उपलब्ध होतील. शिवाय यामधून नागपूर महानगरपालिकेला सुमारे १५० कोटीपर्यंत कर मिळणार असून त्यातून मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरातील विकासासाठी अनेक संस्था पुढे येत असून त्यातून विकासात भर पडत असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. शहातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या टीव्‍हीएस चेन्नईच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय ऑरेंज सिटी स्ट्रीटचे उत्कृष्ट डिझाईन तयार करणारे आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

जनेतेच्या सहकार्यानेच शहराचा विकास : महापौर नंदा जिचकार
शहराच्या विकासाचा झंझावात रोजच आपण अनुभवत असून प्रत्येक नागपूरकरांच्या भविष्याला दिशा देणारे सर्व विकासकामे आहेत. शहराला लाभलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांमुळेच ही कामे शक्य होत आहेत. मात्र केवळ चांगले नेते असूनच विकास होऊ शकत नाही, यासाठी कार्यक्षम अधिकारी आणि जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असते. आपल्या नागपूर शहरात होत असलेली विकास कामे ही सुद्धा जनतेच्या सहकार्यानेच साकारली जात आहेत, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन सत्ता पक्षनेते संदीप जोशी यांनी केले तर आभार नगरसेवक किशोर वानखेडे यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement