Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Oct 23rd, 2018

  स्मार्ट सिटीवर नगरसेवकांची कार्यशाळा

  महापालिका व इक्वी सिटी यांचा संयुक्त उपक्रम

  नागपूर: नागपूर शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांची नगरसेवकांना माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, इक्वी सिटी आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.२३) ला राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन महाल येथे नगरेसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

  या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, बसपा गट नेते मोहम्मद जमाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त (साप्रवि) महेश धामेचा, जयंत पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.

  स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचे नाव दुस-या फेरीत आले. तेव्हापासून शहराचा विकास झपाट्याने वाढलेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्राधिष्ठित विकास, पॅन सिटी यासारख्या कामांची लोकप्रतिनिधींना माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जयंत पाठक यांनी प्रास्ताविकाद्वारे सांगितले. स्मार्ट सिटीच्या पॅन सिटी सोल्युशन्सअंतर्गत नागपूर शहरात विविध ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. हा उपक्रम राज्यातील नव्हे तर देशातील पहिला उपक्रम आहे.

  उद्घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार बोलताना म्हणाल्या, स्मार्ट सिटीमध्ये नागपूर शहरामध्ये नाव प्रविष्ठ झाल्यानंतर शहराचा विकास झपाट्याने वाढत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प, मलनिःस्सारण प्रक्रिया प्रकल्प हे जागतिक स्तरावर पथदर्शी ठरले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट वाहतूक, स्मार्ट बसस्थानके हे देखील उपक्रम महत्त्वकांक्षी आहेत. शाश्वत विकास हेच स्मार्ट सिटीचे प्रमुख उद्दीष्टे असून त्यानुसारच नागपूर शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने होत आहे. आपण लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत जागरूक राहून नागरिकांना या प्रकल्पाबाबत अवगत करावे, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

  याप्रसंगी प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे बोलताना म्हणाले, स्मार्ट सिटीमुळे नागपूर शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे, यात काही शंका नाही. नागपूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मनपा प्रशासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांचे स्वागत इक्वी सिटीच्या अमृता आनंद यांनी केले.

  या कार्यशाळेत स्मार्ट सिटी मिशनचे धोरण व मार्गदर्शक तत्त्वे, नागपूर स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाबाबत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन जयंत पाठक यांनी केले.

  कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, इक्वी सिटीचे शेखर गिरडकर, काशीम तिवारी यांच्यासह नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145