Published On : Fri, Jun 19th, 2020

स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ, विकासाचा खेळखंडोबा !

Advertisement

महापौरांनी आयुक्तांचा घेतला समाचार ः बेकायदेशीरपणे ‘सीईओ’पद बळकावल्याचा आरोप

नागपूर ः संचालक मंडळाची मंजुरी नसताना बळजबरीने, असंवैधानिक पद्धतीने, बेकायदेशीररित्या सीईओ कसे झाले? असा प्रश्‍न उपस्थित करीत महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रातून आयुक्तांचा खरपूस समाचार घेतला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा हेतुपुरस्सरपणे बट्ट्याबोळ करीत असून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा करण्यासाठी आयुक्त जबाबदार आहेत, असा घणाघात महापौरांनी केला. महासभेच्या पूर्वसंध्येला महापौरांच्या आरोपामुळे उद्या, शनिवारी होणाऱ्या सभेत प्रशासकीय भूकंप होण्याची शक्‍यता आहे.

काल, महापौर संदीप जोशी यांनी स्मार्ट सिटीच्या (एनएसएससीडीसीएल) पाच संचालकांसह कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत अनेक आश्‍चर्यकारक मुद्दे पुढे आले. त्यामुळे महापौर चांगलेच संतप्त झाले. त्यांनी 24 तासांत सहा महिन्यांतील निर्णयाची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

स्मार्ट सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीतून महापौरांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. स्मार्ट सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीतून आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी झालेले नियुक्तीही अवैध असल्याचे महापौरांनी नमुद केले. संचालकांची नियुक्ती संचालक मंडळाच्या बैठकीत होते.

मात्र, आयुक्त आले तेव्हापासून संचालक मंडळाची एकही बैठक झाली नाही. अशा स्थितीत आयुक्त संचालक व सीईओ कसे झाले, असा प्रश्‍नही महापौरांनी उपस्थित केला. प्रवीण परदेसी या कंपनीचे चेअरमन असून कंपनी कायद्याप्रमाणे संचालक मंडळाची मंजुरी नसताना चेअरमन मौखिक किंवा लेखी स्वरुपातही कुणालाही सीईओ नियुक्त करू शकत नाही, ही बाब कर्तव्यदक्ष आयुक्तांना माहिती नाही, याबाबत महापौरांनी आर्श्‍चय व्यक्त केले.

संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेऊन आयुक्तांनी फसवणूक केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या निविदा रद्द केल्या, स्मार्ट सिटीचे 50 कोटी बायोमाईनिंगसाठी वापरले, संचालक मंडळाने केलेल्या नियुक्‍त्या रद्द करीत अनेकांना प्रकल्पातून बाहेर काढले, कंपनीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महापालिकेचा प्रभार दिला, याबाबतचे अधिकार तुम्हाला कुणी दिले? असा सवालही महापौरांनी आयुक्तांना केला. प्रसुती रजा नाकारून महिला अधिकाऱ्यांबाबत आयुक्तांचा दृष्टीकोन योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. याप्रकरणी आयुक्तांना प्रतिक्रियेसाठी ‘मेसेज’ केला असता त्यांची कुठलीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

पदाचा गैरवापर’
स्मार्ट सिटीत जे काही सुरू आहे, त्यावरून आयुक्त पदाचा गैरवापर करीत आहेत, असा आरोपही महापौर संदीप जोशी यांनी केला. आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी अनेक गंभीर आरोप केले. आर्थिक अनियमिततेवरही महापौरांनी बोट ठेवले.