
अजनी पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी ओंकारनगर चौकातून बेलतरोडी सिमेंट रोडच्या दिशेने गस्तीवर होते. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ काही संशयित युवक घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून तलवार, लोखंडी सळई, स्टीलचा चाकू, मिरची पावडर, नायलॉनची दोरी आणि दांडा अशी दरोड्यासाठी वापरली जाणारी साधने आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूर्या हातागडे, शेखर हातागडे, महेंद्र माणकर आणि शिवा पारसे अशी आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूर्या हातागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही टोळी नेमका कोणता दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.



