नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत २० किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे १० लाख २८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार, ऑटो, चार मोबाईल फोनसह एकूण १८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताजनगर-टेका परिसरातील मुस्लिम कब्रस्तानासमोरील सार्वजनिक सिमेंट रस्त्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पंचांच्या उपस्थितीत संशयितांची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
या प्रकरणात पोलिसांनी शेख इम्रान उर्फ बाबा, शेख आबिद उर्फ अबू, फैजान रजा आणि मोहम्मद जुनेद यांना अटक केली आहे. तर हॅप्पी उर्फ पाजी उर्फ हरप्रीत सैनी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही आरोपींविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. आरोपी शेख इम्रानचे अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी अनिस ड्रम याच्याशी नातेसंबंध असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.




