चंद्रपूर : नवरात्रोत्सव आणि गरबा आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील व्यक्तींना गरब्यात प्रवेश देण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला आता अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळाले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी यापेक्षा वेगळी भूमिका घेत उत्सव सर्वसमावेशक असायला हवा, असे मत व्यक्त केले.
चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांना नितेश राणे यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या की, आपले सण आणि उत्सव सर्वांना सहभागी करून घेणारे आहेत. एखादी मुस्लिम व्यक्ती गरब्यात सहभागी होत असेल, शांततेत उत्सवाचा आनंद घेत असेल आणि त्यानंतर निघून जात असेल, तर त्यात गैर काहीच वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नितेश राणे यांनी यापूर्वी गरब्यात मुस्लिम तरुणांकडून हिंदू नावाचा वापर करून प्रवेश केला जात असल्याचा आरोप केला होता. हिंदू तरुणींना फसवण्याच्या घटना टाळण्यासाठी गरबा मंडळांनी मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला सुरुवात झाली होती.
दरम्यान, गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावरूनही सध्या वाद सुरू आहे. याबाबत अमृता फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने सण-उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषणासंदर्भात ठरवून दिलेल्या मर्यादांचे पालन करण्याची भूमिका मांडली. उत्सव साजरा करताना डीजेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




