Published On : Tue, Nov 10th, 2020

कौशल्य विकास ग्रामीण भागातही पोहोचावा : नितीन गडकरी

Advertisement

स्कील टेबल बूक’चे प्रकाशन

नागपूर: कौशल्य विकास आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण विविध क्षेत्रातील कौशल्य हे देशातील ग्रामीण आणि मागास भागात पोहाचले पाहिजे. त्यामुळे मागास भागाचा विकास होईल आणि रोजगाराची समस्या नियंत्रणात येईल, असे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘स्कील टेबल बूक’चे प्रकाशन ना. गडकरी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रात ते बोलत होते.

आजच्या स्थितीत संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान होय. या ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ हे आज देशासाठी आणि विविध उद्योगांसाठ़ी अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याशिवाय कौशल्य मिळविता येत नाही. आणि कौशल्य मिळविण्यासाठी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कौशल्य विकास हा आत्मनिर्भरतकडे जाणारा एक मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसाठ़ी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- एमएसएमईचा जीडीपी आज 30 टक्के आहे, 48 टक्के निर्यात तर 11 कोटी रोजगार या विभागाने निर्माण केले आहे. आज आापली ग्रामीण अर्थव्यवस्था ही फक्त 80 हजार कोटींची आहे. येत्या 2 वर्षात ती 5 लाख कोटींची करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे. रोजगार निर्मितीला आमचे अधिक प्राधान्य आहे. विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कौशल्य लागते. त्यामुळे याबद्दल जनतेत जागरुकतेची मानसिकता तयार करावी लागेल, असेही ते म्हणाले.