Published On : Thu, May 10th, 2018

मातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: ‘संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला आहे. या अंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड योजनेसंदर्भातील सादरीकरण अर्थमंत्र्यांसमोर काल करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी व कुंभार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मातीकला क्षेत्रातील कारागिरांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या कलेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना पारंपरिक कौशल्यात वृद्धी करणे, याक्षेत्रातील नाविन्याचा शोध घेत अधिक कलात्मकता आणणे, निर्मिती ते विक्रीपर्यंतच्या साखळीचे मुल्यवर्धन करणे, या विविध घटकांचा एकात्मिक विकास करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा बोर्ड स्थापन करण्यामागचा उद्देश आहे, असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले, अर्थसंकल्पात यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना तात्काळ करण्यात यावी. समितीमध्ये अशासकीय सदस्यांचा देखील समावेश करण्यात यावा. मातीपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची सूची तयार करण्यात यावी. योजना कागदावर न राहता त्याची उपयोगिता सिद्ध व्हावी यादृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळाने त्यांच्याकडे या क्षेत्रातून नोंदणीकृत झालेल्या 50 हजार कुटुंबांची यादी पुढील बैठकीत सादर करावी. तसेच गावपातळीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खादी ग्रामोद्योग मंडळाकडे नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.

गुजरातमध्ये मातीकला कलाकारी मंडळांतर्गत मातीकला उद्योगास खूप प्रोत्साहन देण्यात आले आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन भेट द्यावी, त्यांचा प्रकल्प समजून घ्यावा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची उपलब्धता, वस्तू निर्मितीचे प्रकार, यातील अत्याधुनिकता, त्यासाठी त्यांनी केलेली वित्तीय तरतूद, बाजारपेठेचा अभ्यास आणि मातीकला वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा व त्याचा अहवाल सादर करावा, तेथील अधिकाऱ्यांना सविस्तर सादरीकरण करण्यास महाराष्ट्रात निमंत्रित करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

राज्यात कुंभार कामाचे प्रशिक्षण देणारी एकच संस्था कार्यरत आहे, अशी माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने बैठकीत देण्यात आली त्यावर या संस्थेची इमारत, त्यांच्याकडे असलेली यंत्रसामग्री, तिथे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे स्वरूप याची माहिती घेण्याचेही त्यांनी सांगितले.

मातीकलाच्या माध्यमातून कलात्मक वस्तू बनवताना लागणारी यंत्रसामग्री विकणाऱ्या संस्थांचे नाव, पत्ते मिळवण्यात यावेत, याची एक डिक्शनरी तयार केली जावी, माती कलेअंतर्गत तयार होणाऱ्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जावे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, यासंदर्भात केंद्र शासनाची काही योजना आहे का, हे देखील तपासले जावे. मातीच्या वस्तूंचे आरोग्यविषयक लाभ लोकांपर्यंत पोहोचवावेत, प्लास्टिकला मातीकला वस्तू पर्याय होऊ शकतात का, असल्यास कोणत्या स्वरूपात, याचा देखील अभ्यास केला जावा. मातीच्या वस्तूंचे मार्केट असेसमेंट केले जावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.