Published On : Thu, May 10th, 2018

महाराष्ट्राच्या महासंस्कृतीचा आढावा आता पुस्तकरुपात

मुंबई : कला, संगीत, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, कल्याणकारी उपक्रम राबविणे यावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा भर आहे. केवळ महोत्सव भरवणे, अथवा अनुदान देऊन चालणार नाही तर सर्व क्षेत्रातील प्रतिभांचा वारसा वृध्दींगत व्हावा यासाठी प्रयत्न होणेही आवश्यक आहे. गौरवशाली इतिहास असणाऱ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा येणाऱ्या काळात अधिकाधिक समृध्द करण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या वर्षभरात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्द केलेल्या महासंस्कृतीचा आढावा आता पुस्तकरुपात प्रसिध्द करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सन 2017-18 या वर्षात पार पडलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार प्रदान सोहळे यांच्या छायाचित्रांच्या प्रती संग्रहित केलेले पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात राज्यात आयोजित केलेले कार्यक्रम आणि प्रदान केलेले पुरस्कार हे महासंस्कृती या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित होणे म्हणजे त्या क्षणांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देण्यासारखेच आहे. हे पुस्तक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या युवा पिढीला प्रेरणा देणारे, दिशा देणारे ठरणार आहेत. महाराष्ट्राला लाभलेली सांस्कृतिक परंपरा, उत्कृष्ट कलाकारांची साथ संगत, मान्यवरांचा कला क्षेत्रातील प्रवास आणि त्यांचे कार्य चित्रांमधून दर्शविणारे क्षण यामधून महाराष्ट्राला लाभलेल्या प्रतिभेचा प्रत्यय येतो. या पुस्तकामुळे वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्राने केलेल्या यशस्वी वाटचालीची झलक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या विद्यमाने राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कलाकारांच्या कलागुणांना आणि राज्य शासन विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असलेले या उपक्रमांच्या माहितीचा खजिना देण्याच्या उद्देशाने महासंस्कृती पुस्तकरुपात सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेला यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम याची माहिती होणार आहे. राज्यातील सांस्कृतिक अंगाची माहिती होण्याबरोबरच भावनात्मक ऐक्य निर्माण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक जनतेने कायम प्रतिसाद दिला आहे. कला, संगीत, नाट्य आदी कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टिकोण उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे. या सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनांतर्गत राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव तसेच संगीत, नृत्य तमाशा, कीर्तन, लोककला इत्यादी विविध कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच संचालनालयातर्फे नाट्य प्रशिक्षण शिबीरे, तमाशा शिबीरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येते तसेच आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या वृद्ध व अपंग कलाकारांना आर्थिक मदत, सांस्कृतिक कार्य करत असलेल्या संस्थांना अनुदान असे विविध कार्यक्रम सांस्कृतिक संचालनालयांतर्गत होत असतात. या सर्व कार्यक्रमांचा सचित्र आढावा या पुस्तकाद्वारे घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील समृद्ध परंपरेला जतन आणि संवर्धन करण्यासाठी महासंस्कृतीचे प्रकाशन करण्यात आले असून रंगीत छायाचित्र, वस्तुनिष्ठ आणि महत्त्वपूर्ण माहितीबरोबरच आकर्षक मुखपृष्ठ व सुटसुटीत मांडणी यामुळे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच येईल.