Published On : Thu, Oct 29th, 2020

लाखांदूर तालुक्यात धान्य साठयाकरिता तयार होणार नवे सहा गोडाऊन

· एकूण 10800 मेट्रिक टन असेल गोडाउनची क्षमता

· विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रयत्नांना यश

Advertisement

भंडारा : भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र घेतले गेलेले उत्पादन किंवा त्याची साठवणूक करण्यासाठी कुठल्याही तालुक्यांमध्ये मोठी जागा म्हणजे गोडाऊन नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा गोडाऊनच्या बाहेर असलेला धान देखील नैसर्गिक आपत्तीमुळे खराब होत होता. शासनाकडे नवीन आणि मोठ्या गोडाऊनची मागणी करण्यात आली होती. हा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावलेला आहे.

Advertisement

विशेष बाब म्हणून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे 10800 मे. टनचे म्हणजे प्रत्येकी 1800 टनचे सहा गोडाउन मंजूर झालेले आहे. यापूर्वी लाखांदूर तालुक्यामध्ये 1500 मेट्रिक टन क्षमतेचे 1 गोडाऊन आहे. मात्र धान साठवणुकीकरिता व्यवस्थित आणि निश्चित अशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अवकाळी पाऊस आणि या प्रकारच्या आपत्तीमुळे धान्य खराब होत असते. आणि म्हणून मोठ्या गोडाऊनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. ह्या मागणीच्या संदर्भाने नवीन 6 गोडाऊन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे दिला होता.

सदर गोदामाच्या अंदाजपत्रकास व बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक सहमती दिलेली असून या प्रस्तावाची किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे या प्रस्तावास मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे. ही बाब शासकीय गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय मंजुरी देण्याची बाब म्हणून शासनाच्या विचाराधीन होती. यावर 27 ऑक्टोबर 2020 रोजी शासन निर्णय करून 10800 टन क्षमतेच्या या गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावित गोदामाची अंदाजपत्रकीय किंमत ही 29 कोटी 96 लक्ष 38 हजार रुपये असून सुमारे 23 कोटी 61 लक्ष 68 हजार रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष करून याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण या भागातील 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण यानिमित्ताने आहे.

येणाऱ्या दिवसांमध्ये साकोली आणि लाखनी तालुक्यामध्ये देखील याप्रकारचे मोठे गोडाऊन निर्माण करण्यात येतील, शेतकरी कष्टकरी जनतेसाठी आणि आपल्या भागातील लोकांच्या सोई सुविधासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement