Published On : Sat, Sep 9th, 2017

सिकलसेल आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र सुरु करणार -नितीन गडकरी

नागपूर : सिकलसेल, थॅलेसेमिया यासारख्या जीवघातक रक्तविकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात असल्यामुळे उत्तर नागपूर येथे 250 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र सुरु करण्यात आले. केंद्र शासनातर्फे आवश्यक संपूर्ण मदत देण्यात येईल यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात रक्तपेशी दानाला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा ट्रस्ट, मॅरोडोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिल्या मॅरोडोनर नोंदणीचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुषृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री गडकरी बोलत होते.

यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार गिरीष व्यास, ना. गो. गाणार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, टाटा ट्रस्टचे बर्जिस तारापोरवाला, आशिष देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यु निसवाडे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती अनुराधा श्रीखंडे आदी उपस्थित होते.

रक्तपेशी दानाला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामुळे जीवघातक रक्तविकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्तपेशी दात्यांची माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, नागपूरसह विभागासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. ल्युकेमिया, लिमफोमा, सिकलसेल, थॅलेसेमिया आदी आजारासाठी रक्तपेशीचे दान देण्यासाठी निरोगी रक्त दात्यांची माहिती संकलित होणार आहे. नागपूरातील एकाच भागात 40 हजार सिकलसेलचे रुग्ण असल्यामुळे तसेच विभागातील इतरही जिल्ह्यात मोठयाप्रमाणात या आजाराचे रुग्ण असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा व या आजारावर संशोधनाची आवश्यकता आहे.

उत्तर नागपूर भागातील साडेचार एकर जागेवर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सुसज्ज 250 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत केंद्रीय वैद्यकिय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हॉस्पिटल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून यासाठी राज्य शासनातर्फे आवश्यक निधी व पुढाकार घेतल्यास केंद्र शासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येईल. या प्रकल्पासाठी टाटा ट्रस्टतर्फे सुध्दा सहकार्य घेण्यात येणार असल्याचे सांगतांना श्री. गडकरी म्हणाले की, इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सिकलसेल रुग्णांसाठी स्वतंत्र केंद्र सुरु करण्यात आले होते. हे केंद्र सुरु करण्यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयात उत्कृष्ठ काम करणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. डॉक्टारांनी सुध्दा गरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी भारतातील पहिल्या मॅरोडोनर रजिस्ट्रीला सुरुवात होत असल्यामुळे रक्तपेशी सारख्या दुर्धर आजारावर प्रभावी उपाययोजना करणे सुलभ होणार असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, सरासरी चार ते पाच हजार रुग्णांना बोन मॅरोची आवश्यकता आहे. त्यासाठी इच्छुक दात्यांची यादी तयार झाल्यास त्यांना लाभ देणे सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे अवयव दानाची चळवळ तसेच जनजागृती करण्याची गरज असून राज्यात 14 हजार रुग्ण किडनीसाठी प्रतिक्षा यादीवर आहे. यातील केवळ 131 रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दान मोहिमेत सहभाग घेतल्यास सात रुग्णांना जीवनदान मिळू शकते. या चळवळीला मोठया प्रमाणात जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

जीवनरक्षक सेनेत सहभागी होऊन रक्तपेशी दान देण्यासाठी कटिबध्द होण्याची शपथ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सर्व उपस्थितांना दिली तसेच बोनमॅरो दान करणाऱ्या श्रीमती आरती कोलते, प्रतिभा जाधव, ज्यूईली वाहाने, डॉ. ज्योसना अजनकर, मोहित मोकसवाला, नीतू अग्रवाल यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी सहकारी संस्थेतर्फे पाच लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी डॉ. पी.डी.कुंभलकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना यावेळी दिला.

टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी बर्जिस तारापोरवाला तसेच श्री आशिष देशपांडे यांनी टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त उपक्रमात माहिती देतांना सांगितले की, संभाव्य अस्थिमज्जा दात्यांची रजिस्ट्री बनविण्यासाठी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ नागपूर येथून होत असून महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गरजू रुग्णांसह दात्यांच्या जलद, कार्यक्षम आणि परिणामकारक मदत उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्ट सोबत हा प्रकल्प सुरु होत असून राज्यातील 17 प्रमुख शहरामधून स्वयंसेवी देणगीदारांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, मुंबई, औरगांबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो हॉस्पिटल, आयुर्वेदिक महाविद्यालय, नरसिंग कॉलेज आदी विविध संस्थातर्फे रक्तपेशी दानांसाठी जागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. यामध्ये सात हजार विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी सहभागी झाले होते.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त मोहिमेची माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यु निसवाडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविका रक्तपेशी दानासाठी बांधिलकी निर्माण करण्यासोबतच शासकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली.