Published On : Sat, Sep 9th, 2017

कॉक्लियर इन्प्लाँट केंद्र कर्णबधीरांसाठी वरदान – नितीन गडकरी

Advertisement

नागपूर: मध्य भारतातील आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) हे कॉक्लियर इन्प्लाँट केंद्र लावणारे राज्यातील पहिले रुग्णालय आहे. मेयोतील कॉक्लियर इन्प्लाँटमुळे लहान मुलांना आता ऐकता व बोलता येणार आहे. त्यामुळे गरीब मुलांसाठी हे नक्कीच वरदान ठरले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉक्लियर इन्प्लाँटच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, डॉ. मिलींद किर्तने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, यापूर्वी कॉक्लियर इन्प्लॉट बसविणे हे खूप खर्चिक होते. तसेच ते बसवण्यासाठी मुंबईला जावे लागत असे. मात्र आता नागपुरातच ही सुविधा निर्माण झाल्यामुळे मध्य भारतातील गोरगरीब मुलांसाठी सोयीचे झाले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या सहकार्यातून हे काम झाल्याचे समाधान आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकूण चार मुलांना कर्णबधीर यंत्राचे वाटप करण्यात आले. उद्या या मुलांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून, उर्वरीत सहा जणांची टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या स्थितीत खासगी वैद्यकीय सेवा खूप महागल्या आहेत. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून गरीब मुलांवर उपचार करता येतील. शासकीय रुग्णालयांनी चांगली सेवा दिल्यास त्याचा जनतेला उपचार घेताना फायदा होईल. त्यामुळे नागपुरातच हे केंद्र सुरु करुन लोकार्पण करण्यात आले आहे. त्याचे खूप मोठे समाधान मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

तसेच आता स्थानिक प्रशिक्षित डॉक्टरांकडून येथे शस्त्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे डॉ. मिलींद किर्तने यांनी या इन्प्लॉट उपकरणाची नागपुरात निर्मिती करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत संशोधनाशी संबधित माहिती द्यावी. त्याच्या आधारे त्याची मिहान येथे निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाकडून हवे ते सहकार्य करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कु. आराध्या नवलकर, नक्षत्र तलमले, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद आवाज या चार बालकांना कॉक्लियर इन्प्लाँट उपकरणाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचया हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. विरल कामदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा ठाकरे यांनी तर आभार डॉ. जीवन वेदी यांनी मानले.