Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी संबंध;सीताबर्डीत दोन गुन्हे दाखल

Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी संबंध;सीताबर्डीत दोन गुन्हे दाखल

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार दिल्याच्या दोन घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आल्या आहेत. एका प्रकरणात समाजमाध्यमावरून झालेली ओळख प्रेमसंबंधात बदलली, तर दुसऱ्या प्रकरणात अमरावती येथे झालेल्या ओळखीनंतर तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. दोन्ही प्रकरणांत सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या प्रकरणातील २७ वर्षीय तरुणीची आरोपी प्रज्वल माटे याच्याशी समाजमाध्यमाद्वारे ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपानुसार, प्रज्वलने तरुणीशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने केला आहे.

काही काळानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या प्रकारामुळे मानसिक तणावात आलेल्या तरुणीने कीटकनाशक प्राशन केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी प्रज्वल माटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक झालेली नाही.

बाईट : कोमल उबाडे, पोलीस उपनिरीक्षक, सीताबर्डी पोलीस ठाणे

Advertisement

दुसऱ्या प्रकरणात २१ वर्षीय तरुणीची रमण जाधव याच्याशी २०२४ मध्ये अमरावती येथे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झाले. शिक्षणासाठी तरुणी नागपुरात आल्यानंतरही दोघांचा संपर्क कायम होता.

आरोपानुसार, रमणने लग्नाचे आश्वासन देत तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, तरुणीने लग्नाबाबत आग्रह धरल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. तरुणीने याबाबत आरोपीच्या बहिणीलाही माहिती दिली. त्यानंतर वाद वाढला. आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे.

दोन्ही घटनांमध्ये तरुणींच्या तक्रारी आणि जबाबाच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.