नागपूर – शहरातील मनीषनगरमधील एका प्रसिद्ध बिअर बारमध्ये सरकारी दस्तऐवजांवर चर्चा सुरू असलेला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती टेबलावर फायलींचा गठ्ठा उघडून दारूचे घोट घेत तपासणी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे.
व्हिडिओमधील एक जण त्या शासकीय फायलींवर सह्या करत असल्याचेही दिसत आहे. या तिघांनी नेमक्या कोणत्या विभागाच्या फायली बारमध्ये आणल्या होत्या, त्यांचं पद काय आहे, आणि फायली इतक्या बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी तपासण्यामागे उद्देश काय, यासंबंधी सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या जबाबदारीवर आणि गोपनीयतेच्या धोरणावर गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत असून, “बारमध्ये सुरु असलेला ‘शासन कारभार'” अशी उपरोधिक टीका केली जात आहे.
दरम्यान, संबंधित बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवली, तर फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवणे कठीण ठरणार नाही. मात्र अद्याप ना प्रशासनाकडून ना पोलिसांकडून याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.या प्रकरणामुळे शासकीय कागदपत्रांच्या गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर तातडीने कारवाई होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.