
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट उसळली असून तापमानात मोठी घसरण जाणवत आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्यातील अनेक शहरांत गारठ्याचा जोर कायम असून उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसतोय.
दरम्यान, गुरुवारपासून काही भागात गारठा किंचित कमी झाल्याचं हवामान विभागाने नमूद केलं. सकाळ-संध्याकाळ ढगाळ वातावरणाची नोंद होत असून वातावरणात बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा देत तीन जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरींची शक्यता-
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत हवामानातील अचानक बदलामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 24 तासांत पावसाच्या सरी खेळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
धुळ्यात थंडीचा कहर – 7.5 अंश सेल्सिअस-
राज्यात तापमानात कमालीची घसरण दिसून आली असून धुळे जिल्ह्यात सर्वात निचांकी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीमध्ये 8.9 अंश, तर निफाडमध्ये 8 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला. पुणे, आहिल्यानगर आणि महाबळेश्वरासह अनेक भागांत तापमान 11 अंशांच्या खाली गेले आहे.
पुण्यातील थंडीची चर्चा रंगत-
पुण्यातील पहाटेची कडाक्याची थंडी पुणेकरांना अक्षरशः थरथर कापायला लावत आहे. थंडी इतकी वाढली की सारसबागेतील गणपती बाप्पालाही परंपरेनुसार लोकरचा स्वेटर आणि कानटोपी परिधान करून थंडीपासून ‘संरक्षण’ देण्यात आलं. गेल्या काही वर्षांपासूनची ही परंपरा या वर्षीही कायम ठेवण्यात आली असून भक्तांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अतिरिक्त सूचना-
हवामानातील या वेगवान बदलामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन विभागाने केले आहे. पर्वतीय भागात थंडीचा जोर अधिक वाढण्याची आणि सकाळ-संध्याकाळ धुक्याची शक्यता कायम राहील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात तापमान घसरत असतानाच ढगाळ वातावरणामुळे हवामानात अचानक उलथापालथ होण्याची शक्यता असून पुढील 24 तास राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.









