Published On : Tue, Dec 4th, 2018

देशाच्या जडणघडणीत सिंधी समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री

सिंधी समाजातील व्यक्तींना निवास व वाणिज्य भूखंडांचे आखिव पत्रिका वाटप, नागरिकांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान

नागपूर: संघर्ष करित विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या सिंधी समाजाचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जरीपटका येथील सिंधूनगर मैदान येथे महसूल विभागाच्या वतीने निवास व वाणिज्य भूखंडांचे आखिव पत्रिका वाटप व विदेशी नागरिकांना नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, नगरसेविका प्रमिला मथरानी, महेंद्र धनविजय, घनशाम कुकरेजा, भोजराज डूंबे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, माधवदास ममतानी, केशवदासजी, सन्मुखदास उदासी, दामोदरजी महाराज, दादी सुशिलाजी ही संत मंडळीही उपस्थित होते.


सिंधी समाजातील व्यक्तींसाठी भोगवटदार वर्ग -2, सत्ताप्रकारात वर्ग-1 असा बदल करण्यात आला आहे. या भूखंडांचे आखिव पत्रिका वाटप व नागरिकांना नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. ‘गुरुगोविंदसिंग यांचे कार्य’ या निलम विराणी लिखित पुस्तकाचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला सिंधी छेज नृत्यांने सर्वांचे मन आर्कषून घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंधी संस्कृती ही प्राचिन संस्कृती असून देशाच्या विकासात सिंधी समाजाचे योगदान मोलाचे आहे. फाळणीचे मोठे दु:ख सिंधी समाजाने झेलले आहे. फाळणीच्यावेळी सिंधी समाज आपली शेतीवाडी, दुकान, उद्योग व्यवसाय व मालमत्ता तेथेच सोडून भारतात आला. येथे आल्यानंतर जिथे जमिनी मिळतील तिथे हा समाज कॉलनी, कॅम्प करुन राहिला. तेथे राहून सिंधी समाजाने संघर्ष करुन मेहनतीने उद्योग व्यवसाय उभे केले. मात्र फाळणीच्यावेळी सिंधी समाजाला मिळालेल्या जमिनींचे मालकी हक्क त्यांना मिळत नव्हते. मोठ्या संघर्षानंतर आता सिंधी समाजातील व्यक्तींसाठी भोगवटदार वर्ग -2 सत्ताप्रकारात वर्ग-1 असा बदल करण्यात आला आहे. यामुळे या समाजातील व्यक्तींना जमीनीचे मालकी हक्क मिळत असून खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखेच आहे. सिंधी संस्कृतीचे समग्र दर्शन घडविणाऱ्या सिंधू आर्ट गॅलरीचे काम प्रगतीपथावर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा म्हणाले, सिंधी समाजातील व्यक्तींसाठी भोगवटदार वर्ग -2 सत्ताप्रकारात वर्ग-1 असा बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण होत असल्याने ही आनंददायी बाब आहे. तसेच फाळणीच्यावेळी आलेल्या सिंधी व्यक्ती व त्यांच्या वारसांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात संघर्ष करत सिंधी समाज पुढे आला असून सिंधी समाजाचे योगदान मोठे असल्याचे श्री. कुकरेजा यांनी सांगितले.

आमदार डॉ. मिलिंद माने म्हणाले, सिंधी समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याने अनेक सिंधी बांधवांना याचा लाभ होणार आहे, ही आनंददायी बाब आहे.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर आता विकासपथावर अग्रेसर असून विविध क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्यात येत आहे. सिंधी समाजाची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होत असल्याने समाजासाठी ही आनंदाची बाब आहे.

सूत्रसंचालन वंदना खुशलानी यांनी केले.