भंडारा: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या लेंडेझरी–मोगरकसा संवर्धन क्षेत्रात नुकतेच दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या जोडप्याचे दर्शन झाले असून, हे दृश्य छायाचित्रकार श्रवण फाये यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. या फोटो आणि व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
वन्यजीव छायाचित्रकार फाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी या जंगलात काळा बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या असल्या तरी, जोडीने काळे बिबटे पाहायला मिळणे ही पहिलीच वेळ आहे. फाये यांना ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे अस्तित्व लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दुर्मिळ क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
काळा बिबट्या ही बिबट्याच्याच प्रजातीतील असून त्याच्या शरीरातील मेलानिन नावाच्या रंगद्रव्याच्या अधिक प्रमाणामुळे त्याचा रंग पूर्णपणे काळसर दिसतो. जवळून पाहिल्यास त्याच्या अंगावर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे गोलाकार डिझाइनही जाणवतात. त्यामुळे तो स्वतंत्र प्रजातीचा नसून बिबट्याचाच एक दुर्मिळ प्रकार आहे.
महाराष्ट्रात सामान्य बिबट्यांची संख्या चांगली असली तरी, काळे बिबटे फारच दुर्मिळ मानले जातात. त्यामुळे लेंडेझरीच्या जंगलात आढळलेल्या या जोडप्याच्या दर्शनाने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाकडून या बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, संवर्धनासाठी आणखी काही उपाययोजना राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.